भरधाव कंटेनरने चौघांना चिरडले; आईसह मुलीचा जागीच मृत्यू

पुणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव कंटेनरने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडले. आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. किवळे-देहूरोड परिसरात ही घटना घडली.

हा अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात मृत्यू झालेल्या आई आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत वाहतूक सुरळीत केली. या भीषण अपघातात एकाच वेळी मायलेकीने जीव गमावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांना घटनास्थळी मोबाईल सापडले असून, अपघातग्रस्त कुटुंबीयांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Share