अमिषा पटेलने वडिलांवरच केला कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयापेक्षा बाकीच्या कारणांमुळेच जास्त चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाला मिळालेल्या दणदणीत यशामुळे अमिषा पटेल हे नाव बॉलिवूडमध्ये झळकले. या चित्रपटात ती हृतिक रोशनची नायिका म्हणून झळकली होती. या पहिल्याच सिनेमाने अमिषा पटेलला रातोरात स्टार केले. त्यानंतर गदर, हमराज, भूल भुलैय्या या चित्रपटांनी तिचा अभिनय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला; पण लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अमिषा पटेलने तिच्या वडिलांवरच आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर तिने वडिलांना कायदेशीर नोटीस बजावून कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आणला होता.

वीस वर्षांपूर्वी अमिषा पटेल बॉलिवूडमध्ये आली आणि तिने तिचा एक चाहतावर्ग बनवला. ९ जून १९७६ रोजी मुंबईत अमिषाचा जन्म झाला. आशा पटेल आणि अमित पटेल यांची ती मुलगी. सध्या ४६ वर्षांची असलेल्या अमिषाची अभिनय कारकीर्द सुरू झाली २००० साली. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन हे त्यांचा मुलगा हृतिकसाठी ‘कहो ना प्यार है’ हा सिनेमा लाँच करत होते आणि त्यासाठी नायिकेच्या शोधात होते. अमिषाला ही संधी मिळाली आणि तिचे आयुष्य बदलून गेले. अमिषाला रोमँटिक थ्रिलर पहिला सिनेमा मिळाला जो खूपच हिट झाला आणि बॉलिवूडमध्ये अमिषाचे दणक्यात पदार्पण झाले. अमिषाचे आई-वडीलही तिच्या या यशाने खूप आनंदात होते.

‘कहो ना प्यार’ हा सिनेमा अमिषाला मिळाला होता तो तिचे वडील अमित पटेल यांच्याच ओळखीतून; परंतु तरीही अमिषाने तिच्या आर्थिक कमाईतील १२ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा गंभीर आरोप वडिलांवर केला केला. त्यांना कोर्टाची नोटीस पाठवली. हे प्रकरण २००४ साली खूपच गाजले होते. नंतर हे प्रकरण निवळले. अमिषाने माघार घेतली; पण वडिलांवरच आर्थिक फसवणुकीचा आरोप करणाऱ्या अमिषा पटेलकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला, साहजिकच तिच्या फिल्मी करिअरवरही याचा परिणाम झाला.

https://www.instagram.com/tv/CelL7RFICsV/?utm_source=ig_web_copy_link

अर्थशास्त्रामध्ये गोल्ड मेडेल मिळवणाऱ्या अमिषा पटेलने लोकप्रियता मिळवली खरी; पण त्यात तिच्या वाट्याला टीकाच मोठ्या प्रमाणात आली. तिच्यावर फसवणूक केल्याचे, चोरी केल्याचे आरोपही झाले होते. काही महिन्यांपूर्वी एका संस्थेकडून कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अमिषाने पैसे घेतले खरे; पण त्या कार्यक्रमाला काही मिनिटं थांबून काढता पाय घेतल्याने अमिषावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या अभिनेत्रीनं वडिलांवर देखील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

https://www.instagram.com/tv/Cekz3hTFODW/?utm_source=ig_web_copy_link

‘कहो ना प्यार है’ मध्ये ऋतिक रोशनची सहअभिनेत्री म्हणून अमिषाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिच्या तेवढ्याच चित्रपटाला मोठी पसंती मिळाली. त्यानंतर मात्र तिचा फारसा प्रभाव प्रेक्षकांवर पडला नाही. ‘गदर’मध्ये काही प्रमाणात तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. सनी देओलच्या अभिनयापुढे ती फिकी पडली. तिचा ‘हमराज’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. मात्र, तो तिच्यामुळे नव्हे तर त्या चित्रपटाच्या कथेमुळे. आतापर्यंत अमिषाने ४० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, तिच्या करिअरचा ग्राफ हा नेहमीच खाली येताना दिसला. याला कारण तिचा स्वभाव. नेहमीच वेगवेगळ्या वादात अडकलेल्या अमिषाला अनेक निर्मात्यांनी नाकारले. तिने केवळ हिंदीच नाही तर तामिळ, तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

अमिषाने जेव्हा वडिलांनाच कायदेशीर नोटीस पाठवली तेव्हा तिच्या चाहत्यांना ही गोष्ट काही आवडली नाही. तेव्हापासून अमिषाच्या लोकप्रियतेत घट होण्यास सुरुवात झाली. सौंदर्य, अभिनय या दोन्ही गोष्टी असूनही अमिषा पटेल तिच्या कौटुंबिक वादामुळे कायमच चर्चेत राहिली. अर्थशास्त्रात सुवर्णपदक विजेती असलेल्या अमिषा पटेलने वडिलांवर तिच्या कमाईत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून नात्याचे अर्थशास्त्र जपले नाही. सध्या अमिषा सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड फोटो शेअर करून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करताना दिसते.

सध्या अमिषा बॉलिवूडपासून लांब आहे. गेल्या कित्येक वर्षात ती कोणत्याही सिनेमात दिसलेली नाही. काही वर्षापूर्वी अमिषा ‘बिग बॉस’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसली; पण सिनेमा आणि तिच्यात आता खूप मोठे अंतर आले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूलभुलैया २’ या सिनेमामुळे अमिषाच्या नावाची चर्चा झाली. कारण, या सिनेमाच्या पहिल्या भागात तिची महत्वाची भूमिका होती. एकेकाळी अमिषावर फिदा असलेले चाहतेही तिच्याविषयी काहीच बोलत नाहीत. वयाच्या ४६ व्या वर्षीही अमिषा सिंगल आहे.

Share