‘अब देवेंद्र अकेला नही है’ म्हणत अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

पुणे : राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तिन्ही उमेदवार निवडून आले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या विजयाचे श्रेय दिले जात आहे. राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवसेनेसह महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. ‘देवेंद्र न कभी अकेला था, ना अकेला है, उनके साथ पुरी कायनात है’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या पतीचे कौतुक केले आहे.

राज्यसभा निवडणुकीमुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या निवडणुकीसाठी काल (१० जून) मतदान झाल्यानंतर निकालाचा ड्रामा रात्रभर सुरू होता. अखेर आज पहाटे मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव करून भाजपच्या धनंजय महाडिक यांनी गुलाल उधळला. भाजपच्या या विजयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात भारतीय जनता महिला पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने बुधवार पेठ येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, राज्यसभेत जे निवडून आले आहेत, त्यांचे खूप खूप अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि अपक्ष आमदाराच्या पाठिंब्यामुळे भाजपचा मोठा विजय झाला आहे. यामध्ये विजयी झालेले पीयूष गोयल, धनंजय महाडिक आणि अनिल बोंडे या सर्वांना शुभेच्छा देते. आजचा हा विजय सत्याचा आहे. आजचा निकाल पाहता सर्वजण सत्याच्या बाजूने आहेत, असे मला वाटत आहे.

‘अकेला देवेंद्र है क्या करेगा’, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, यावरदेखील अमृता फडणवीस यांनी याप्रसंगी जोरदार प्रत्युत्तर दिले. मला आज या गोष्टीचा खूप आनंद आहे की, देवेंद्र ना कभी अकेला था, ना अब अकेला है, उनके साथ पुरी कायनात है. हम तो साथ मे है. यापुढे राज्यात विकासाचे राजकारण चालणार आहे, टोमणे मारणाऱ्यांचे नाही. जो विकासाचे राजकारण करेल तोच दुनियेत पुढे जाईल, टोमणेबाजीचे राजकारण करणारे मागे राहतील. आजचा विजय हा शिवसेनेला धडा नव्हे, तर आता त्यांना यापुढे धडा सुरू होईल, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

भाजपने रडीचा डाव खेळला या टीकेला प्रत्युत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, जे लोक भाजपकडे आले आहेत, ते सध्याच्या महाविकास आघाडी सरकारचे काम बघून आले आहेत. दुसऱ्या मार्गाची गरजच नव्हती. सरकार कसे चालते हे त्यांना कळाले आहे. हे लोक प्रेमाने भाजपसोबत आले आहेत. भाजप जे काही करत आहे, ते कर्तृत्वाच्या जोरावर करत आहे. रडीचा डाव खेळण्यासाठी ते काही महाविकास आघाडी नाही. भाजप हा भाजप आहे. ती कर्तृत्वाचा डाव खेळते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अमृता फडणवीस यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा मीच बोलत होते आणि आज सर्व जण तेच बोलत आहेत, जे मी बोलत होते. ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी काम केले पाहिजे, त्या प्रकारे ते करत नाहीत, फक्त टोमणे मारायचे काम ते करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या प्रजेसाठी किती योग्य आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी कोणी काही बोलत नव्हते; पण आता प्रत्येक नागरिक बोलत आहे. त्यामुळे आता मला बोलायची गरज नाही. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस ‘किंग मेकर’ ठरले आहेत, असेही अमृता फडणवीस यांनी सांगितले.

Share