राज्यात येत्या पाच दिवसांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : नैऋत्य मॉन्सून मुंबईसह कोकणातील बहुतांश भागात तसेच मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आणखी काही भागांमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आजपासून येत्या पाच दिवसात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. पावसाची तीव्रता ही कोकणात जास्त असण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

११ जून ते १५ जूनपर्यंत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने गुरुवारी सांगितले होते की, मॉन्सून सामान्य गतीने पुढे जात आहे आणि येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. ‘आयएमडी’ च्या अंदाजानुसार मॉन्सून मुंबईत वेळेवर पोहोचला आहे. येत्या ४८ तासात कोकणातील उर्वरित भाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मॉन्सून (मोसमी पाऊस) ची वाटचाल होण्यास अनुकूल स्थिती आहे, अशी माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभाग केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रासह घाटाच्या प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पावसाच्या शक्यतेसंदर्भात इशारे जारी केले आहेत.

हवामान विभागाने ११ जून रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ तर उस्मानाबाद आणि लातूर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मात्र, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाकडून १२ जून रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे, तर सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

१३ जून रोजी रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १४ जून रोजी सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच १५ जून रोजी सिंधुदुर्ग आणि मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
अनुकूल वातावरणामुळे जोरदार प्रवास सुरू झालेला मोसमी पाऊस शुक्रवारी (१० जून) कोकणातून महाराष्ट्रात दाखल झाला असतानाच त्याने द्रुतगती घेत शनिवारी (११ जून) थेट मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणात बहुतांश भागात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मजल मारली. पुढील ४८ तासांत त्याची आणखी प्रगती होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी पाऊस दाखल झाल्याने कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे.

यंदा मॉन्सून सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवस आधीच म्हणजे २९ मे रोजी केरळमधून भारतात दाखल झाला होता. या काळात अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत असल्याने आठवड्याच्या कालावधीतच महाराष्ट्रात मॉन्सूनचा प्रवेश होण्याबाबत अंदाज देण्यात आला होता. मात्र, पावसाच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला. ३१ मे रोजी कर्नाटकच्या कारवारपर्यंत आणि गोव्यापासून काही अंतरावर मॉन्सून पोहोचला. त्यानंतर त्याची कोणतीही प्रगती झाली नव्हती. अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाचा प्रवास गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून थांबलेला होता. अशातच गुरुवारपासून (९ जून) मॉन्सूनच्या प्रवासाला पोषक वातावरण तयार झाले होते. त्यामुळे १० जूनला मॉन्सूनने कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केला आणि त्यानंतर त्याच्या प्रगतीचा वेग कायम राहिला.

मोसमी पावसाच्या प्रवासाला वेग
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे मॉन्सून अर्थात मोसमी पावसाच्या प्रवासाला वेग मिळाला आहे. त्यामुळे ११ जूनला त्याने द्रुतगती प्रवास करून थेट मुंबईपर्यंत मजल मारली आहे. पुणे शहरासह कोल्हापूर, सातारा त्याचप्रमाणे ठाणे, रायगड आदी जिल्ह्यांतही त्याचा प्रवेश झाला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. पुढील ४८ तासांमध्ये कोकणात बहुतांश भागांत प्रगती करून तो गुजरातपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Share