अमृता फडणवीस यांचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरव

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी मास्टरमाइंड फोरममध्ये जनजागृती करणारे भाषण केले. आपल्या सर्वोत्तम कामगिरीने समाजात बदल घडवून आणणाऱ्या आणि सकारात्मक विचारांचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अमृता फडणवीस यांना उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

https://www.instagram.com/p/CeDf0BzLLPI/?utm_source=ig_web_copy_link

अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. देशभरात घडणाऱ्या घडामोडींवर त्या रोखठोकपणे प्रतिक्रिया देतात. अन्न, आरोग्य आणि शाश्वत विकास या विषयावरील जनजागृतीसाठी त्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेल्या होत्या. या महोत्सवाचे अनेक फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत. बेटर वर्ल्ड फंड या संस्थेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत अभिनेत्री शेरोन स्टोन, चार्ली चॅपलीन यांची नात कियारा चॅपलीन, कोटे दिव्होअरची पहिली महिला डॉमिनिक ओउटारा, राजकुमारी घिडा तलाल हे सेलिब्रिटीही उपस्थित होते.

या महोत्सवाला संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान, बॉलिवूड स्टार कमल हासन, अभिनेत्री दीपिका पदुकोण, हीना खान आदी सेलिब्रिटींनीही यांनी हजेरी लावली होती. ७५ व्या कान्स चित्रपट महोत्सवासाठी ८ सदस्यीय ज्युरींमध्ये दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली आहे. यासोबतच भारतला कान्स चित्रपट महोत्सवामध्ये पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान मिळाला आहे. तसेच सत्यजित रे यांचा ‘प्रतिद्वंदी’ हा चित्रपट यंदा कान्स चित्रपट महोत्सवात दाखवन्यात आला. या चित्रपट महोत्सवात १९ मे रोजी आर. माधवनच्या ‘रॉकेट्री : द नम्बी इफेक्ट’ चे स्क्रिनिंग पार पडले.

https://www.instagram.com/p/Cd_DCqcjT8o/?utm_source=ig_web_copy_link

कान्स हा एक जगातील सर्वात प्रतिष्ठित असा चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. जगभरातील अनेक नामांकित सेलिब्रिटी या महोत्सवात सहभागी होतात. भारतातूनही मोठमोठे कलाकार कान्स महोत्सवात रेड कार्पेटवर चालताना दिसतात. यंदा या महोत्सवात अमृता फडणवीस यांनीदेखील हजेरी लावली होती. कान्सला जाण्यापूर्वी त्यांनी ‘मी कान्समध्ये पोहोचले आहे. एका सुंदर जगासाठी…’ अशा आशयाची कॅप्शन देत स्वत:चा एक फोटो ट्वीट केला होता.

अमृता फडणवीस यांच्या कान्स महोत्सवातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. नेटकरी त्यांच्या या ट्वीटवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा मानला जाणारा यंदाचा हा ७५ वा कान्स चित्रपट महोत्सव १७ मेपासून सुरू झाला असून, तो २८ मेपर्यंत असणार आहे. या चित्रपट महोत्सवात वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. त्याचबरोबर सहा भारतीय चित्रपटांना कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मानाचे स्थान मिळाले आहे.

Share