दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा नवा चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज २८ मे रोजी १३९ वी जयंती आहे. याचे औचित्य साधून दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर चित्रपट करत असल्याचे आज जाहीर केले आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ असे या चित्रपटाचे नाव असून, महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या शुभेच्छा देत आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर शेअर करत या चित्रपटाची माहिती दिली आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सध्या नवनवीन चित्रपटांचा जणू सपाटाच लावला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याला काही दिवस उलटले असतानाच आज त्यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा त्यांचा आगामी चित्रपट आहे. या सिनेमात रणदीप हुडा हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारत असल्याचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी जाहीर केले आहे. महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचे पोस्टर आणि मोशन पोस्टर शेअर करताना अभिनेता रणदीप हुडाच्या भूमिकेची ओळख करून दिली आहे. ‘हिंदुत्त्व धर्म नही, इतिहास हैं’ अशी टॅगलाईन या पोस्टरवर देण्यात आली आहे.

https://www.instagram.com/tv/CeFqYeEI8RN/?utm_source=ig_web_copy_link

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना मांजरेकर यांनी म्हटले आहे की, ”सावरकरांबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत; पण एक चित्रपट निर्माता म्हणून मी सावरकरांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सावरकरांबद्दल चित्रपट बनवताना सावरकरांच्या विचारांपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा आणि व्यक्तिरेखा यात सावरकर जसे होते, आहेत आणि राहतील यापेक्षा काही फरक असणार नाही. सावरकरांचे विचार आम्ही चित्रपटातून मांडणार आहोत. त्यामुळे चित्रपटात सावरकरांच्या खऱ्या आयुष्यात फारसा फरक नसेल. ते स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांना विसरता येणार नाही.”

अभिनेता रणदीप हुडा यानेदेखील सावरकर जयंतीच्या शुभेच्छा देत या सिनेमाचे पहिलेवहिले पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये रणदीपने म्हटले आहे की, ”भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या आणि आत्म-वास्तविकतेच्या लढ्यातील सर्वोच्च; पण ज्यांच्याबाबत खूप कमी ऐकिवात आहे अशा वीरांपैकी असणाऱ्याला हा सलाम आहे. मला आशा आहे की, एका खर्‍या क्रांतिकारकाची भूमिका करण्याचे आव्हान मी पेलू शकेन आणि त्यांची खरी कहाणी सांगू शकेन जी दीर्घकाळासाठी दडवून ठेवली गेली होती.”

https://www.instagram.com/p/CeFrek8obZF/?utm_source=ig_web_copy_link

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाची निर्मिती संदीप सिंह आणि अमित वाधवानी यांनी केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू होईल, अशी माहिती समोर आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तिरेखेसाठी रणदीप हुडाने विशेष मेहनत घेतली आहे. या चित्रपटावर आम्ही दोन वर्षांपासून काम करत आहोत. सावरकरांना कधीच यथोचित सन्मान मिळाला नाही. सावरकरांचे खरे चरित्र या निमित्ताने देशाला कळेल, असे निर्माते संदीप सिंह आणि अमित वाधवानी यांनी म्हटले आहे.

Share