आनंद वार्ता…. मान्सून या आठवड्यातच अंदमान बेटावर होणार दाखल; तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात

मुंबई : राज्यात वारंवार हवामानात बदल होत आहेत. सध्या असनी चक्रीवादळामुळे राज्यावर अवकाळी पावसाचे संकट आहे. अशात येत्या चार आठवड्यात देशातील अनेक प्रदेशांत पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. आयएमडी’ च्या अंदाजानुसार यावर्षी मान्सून वेळेआधीच म्हणजे या आठवड्यातच अंदमान बेटावर दाखल होणार असून, तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात येणार आहे.

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील चार आठवड्यात देशभरात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पहिल्या आठवड्यात अंदमान समुद्रावर पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावर आणि त्यापुढील आठवड्यात दक्षिण द्वीपकल्प आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

दरवर्षी मान्सून अंदमानमध्ये २२ मेपर्यंत दाखल होतो; पण हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून या आठवड्यातच अंदमान बेटावर दाखल होणार असून, तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात येणार आहे. १३ ते १९ मेदरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून हजेरी लावणार आहे, तर केरळमध्ये २० ते २६ मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ‘असनी’ चक्रीवादळ आता बांग्लादेश आणि म्यानमारच्या उत्तरेकडील टोकापर्यंत पोहोचले असून, १९ कि. मी. प्रतितास या वेगाने हे वारे वाहत आहेत. ‘असनी’ चक्रीवादळ आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, पश्चिम बंगालमध्ये धडकल्याने या राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

‘असनी’ चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवरही होणार

‘असनी’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशमधील मच्छलीपट्टणमच्या पश्चिमेस घोंघावत आहे. पुढील १२ तासांत ते कमी दाबाच्या क्षेत्रात आणखी कमकुवत होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. यामुळे समुद्रकिनारी असणाऱ्या प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांत वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवरही होणार असल्याचे हवामान खात्याने नमूद केले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा तडाखा वाढला असून, नागरिक उकाड्याने हैराण आहेत तर दुसरीकडे मान्सूनचे लवकर आगमन होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तप्त झळा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

Share