अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून ५९ पानी आरोपपत्र दाखल

मुंबई : १०० कोटी वसुली प्रकरण आणि इतर आरोपाखाली सीबीआय आणि ईडीच्या जाळ्यात अडकलेले आणि सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सीबीआयने आज देशमुख यांच्याविरोधात १०० कोटी वसुली प्रकरणी ५९ पानांचे आरोपपत्र मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात दाखल केले आहे.

या आरोपपत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रमुख आरोपी म्हणून दाखवण्यात आले आहे तर त्यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना सहआरोपी दाखवण्यात आले आहे. या प्रकरणाची लवकरच सुनावणी होणार आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी गेल्या वर्षी २० मार्च रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. अनिल देशमुख अनेक चुकीच्या कामांमध्ये सहभागी होते. त्यांनी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याला मुंबईतील बार आणि रेस्तराँतून १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीरसिंग यांनी या पत्रात केला होता. त्यानंतर १०० कोटी वसुली प्रकरण आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली गेल्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुख यांना अटक केली होती.

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे केंद्रीय तपास संस्थेने २१ एप्रिल २०२१ रोजी देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. देशमुख यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या १०० कोटी वसुली प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझे याला नुकतीच परवानगी दिली आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सीबीआयकडून देशमुख यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोटके ठेवल्याप्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएने सचिन वाझे याला गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक केली होती. वाझे आणि देशमुख वेगवेगळ्या प्रकरणांत गेल्या काही दिवसांपासून कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

Share