नाशिक जिल्ह्यात वणीजवळ ट्रॅक्टरचा भीषण अपघात; ७ जण ठार

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वणी येथील मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मुळाणे बारी येथील घाटात आज भीषण अपघात झाला. भरधाव ट्रॅक्टर उलटून समोरून येणाऱ्या अल्टो कारवर पडल्याने घडलेल्या या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू तर १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला, दोन पुरुष व एका लहान मुलीचा समावेश आहे. जखमींपैकी काहीजणांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

रस्त्याच्या कामासाठी वणी येथून ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून मजुरांना घेऊन एक ट्रॅक्टर कानाशी येथे जात होता. यावेळी मुळाणे बारी येथील घाटात ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरसह दोन्ही ट्रॉली पलटी होऊन समोरून येणाऱ्या अल्टो कार (क्र.एम. एच.४१/ए. झेड.१८०६) वर पडला. कारवर ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्यामुळे कार ट्रॉलीखाली चिरडली गेली. या अपघातात ७ जण जागीच ठार झाले, तर १६ जण जखमी झाले आहेत.

या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात ३ महिला, २ पुरुष व एका लहान मुलीचा समावेश आहे. यातील सहापैकी तीन मृतांची ओळख पटली आहे. सरला बापू पवार (वय ४५), बिबाबाई रमेश गायकवाड (वय ४०), वैशाली बापू पवार( वय ४) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण जळगाव जिल्ह्यातील उंदिरखेडा येथील रहिवासी आहेत. या अपघातात १६ जण जखमी झाले असून, त्यातील १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरेखा अशोक शिंदे, लक्ष्मण अशोक शिंदे, संगीता पोपट पवार, आकाश पोपट पवार, तनुजा दीपक गायकवाड, अनुष्का दीपक गायकवाड, मनीषा दीपक गायकवाड, गणेश बापू पवार, विशाल बापू पवार, गणेश बापू पवार, प्रिया संजय म्हस्के, अजय नवल बोरसे अशी गंभीर जखमींची नावे आहेत. जखमी झालेले सर्वजण जळगाव जिल्ह्यातील आहेत.

या अपघाताची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थ आणि वणी येथील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी काहीजणांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Share