आषाढी वारीची घोषणा; वारकऱ्यांमध्ये उत्साह

पुणे : संपूर्ण वारकरी सांप्रदाय आणि विठ्ठल भक्त ज्याची आस लावून होता त्या आषाढी वारीची घोषणा करण्यात आली आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने जगद्गुरु संतशिरोमणी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येत्या २० जूनला देहू येथून तर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी २१ जूनला आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यावर्षी तिथी वाढ असल्याने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा इंदापूर येथे एक मुक्काम वाढेल, तसेच आंथुर्णे येथेही यंदा पालखी मुक्कामी असेल, अशी माहिती पालखी सोहळा समितीतर्फे देण्यात आली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा २१ जूनला आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही. पायी वारीत खंड पडला होता; पण मागच्या वर्षी परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. दोन वर्षाचा कठीण काळ लोटल्यानंतर यंदा आषाढी वारी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक आहेत. गावागावात वारकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता या सर्वांना संत तुकोबा आणि संत ज्ञानोबांच्या पालखी प्रस्थानाची आणि पायी वारी करून विठोबाच्या चरणी माथा टेकविण्याची आस लागलेली आहे. आता दोन वर्षांनंतर पायी वारीत सहभागी होता येणार असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, ते वारीच्या तयारीला लागले आहेत.

कोरोना महामारीच्या बंधनांनंतर सर्व संतांचे पालखी सोहळे यावर्षी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. शेकडो वर्षांपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अखंडितपणे पार पडतो आहे. या पालखी सोहळ्याची घोषणा रविवारी झाली. यंदा हा पालखी सोहळा देहू येथून २० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे यंदाचे ३३७ वे वर्ष आहे. संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे आणि विशाल महाराज मोरे यांची पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी निवड झालेली आहे. येत्या १० जुलैला पंढरीत आषाढी एकादशीचा महासोहळा होत आहे. त्याकरिता २० जून म्हणजे ज्येष्ठ वद्य सप्तमीला तुकोबारायांचा पालखी सोहळा देहू येथील इनामदारवाडा येथून प्रस्थान करेल. या पालखी सोहळ्यात नोंदणीकृत ३२९ दिंड्या आहेत. मोकळ्या दिंड्यांची संख्या २०० पेक्षा अधिक आहेत. यंदा ही पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवस मुक्कामी असेल. पायी प्रवास पूर्ण करून पालखी ९ जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचेल, तर १० जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल.

गेली दोन वर्षे कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे आषाढी यात्रा मर्यादित स्वरूपात साजरी करण्यात आली होती. आता निर्बंध शिथिल करण्यात आलेले असल्याने यंदाची आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता आहे. पालखी सोहळ्याबरोबर नेहमीपेक्षा अधिक संख्येने वारकरी सहभागी होतील, असा अंदाज आहे. कोरोनानंतर आषाढी यात्रेचा वारकऱ्यांत उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजनात फेरबदल केले आहेत. यंदाची आषाढी वारी मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता असून, या सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी आणि भाविकांना पालखी मार्गावर, पालखी तळावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

 

Share