दोन वर्षापासून रखडलेल्या ‘संत रविदास पुरस्काराची’ घोषणा

पुणेः स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महान संत रोहिदास (रविदास) महाराज यांच्या नावाने सामाजिक न्याय विभागामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय ‘संत रविदास पुरस्कार’ कोविड मुळे गेली दोन वर्षे स्थगित होता. या पुरस्कारांची या वर्षी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती काल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी पुणे येथील कार्यक्रमात दिली.

प्रत्येक समाज घटकाला समान वागणूक मिळावी. जाती-पातीच्या भिंती कोसळून एकमेकांप्रती प्रेम व आदरभाव निर्माण व्हावा, या महान विचारसरणीचा संत रोहिदास महाराजांनी भक्तिमार्गाने देशभरात प्रचार आणि प्रसार करुन देशाला सामाजिक व आध्यात्मिक उंचीवर नेऊन पोहाेचवले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळामार्फत राज्यातील तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात येत असल्याची माहिती मुंडे यांनी यावेळी दिली. तसेच महामंडळाचे भागभांडवल यावर्षी पासून वाढविण्यात येणार असून, याची अधिकृत घोषणा लवकरच होईल, तसेच महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचीही यावेळी त्यांनी माहिती दिली.

Share