आर्ची आली आर्ची…रिंकू राजगुरूचा नवा चित्रपट १७ जूनला होणार प्रदर्शित

मुंबई : प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातील ‘आर्ची’ ही भूमिका साकारणारी आणि एका रात्रीतून स्टार झालेली रिंकू राजगुरू आता तिच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रिंकूचा ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा नवा चित्रपट येत्या १७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटात रिंकू राजगुरूने ‘कृतिका’ ची भूमिका साकारली आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ हा रिंकू राजगुरूचा पहिला चित्रपट. ‘सैराट’ चित्रपटामुळे रिंकू राजगुरूला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामध्ये रिंकूने ‘आर्ची’ ही भूमिका साकारली होती, तर आकाश ठोसर याने ‘परश्या’ ची भूमिका साकारली होती. ‘सैराट’ चित्रपटातील रिंकू आणि आकाशच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘सैराट’ चित्रपटानंतर रिंकूने मागे वळून पाहिले नाही.

रिंकूच्या ‘मेकअप’ आणि ‘कागर’ या मराठी चित्रपटांना तर १००, अनपॉज्ड, २०० हल्ला हो या हिंदी वेबसीरिजलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. सध्याच्या घडीला मराठी अभिनेत्रींमध्ये ती आघाडीची अभिनेत्री आहे. वेबसीरिज असो वा चित्रपट रिंकूने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही रिंकूने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

https://www.instagram.com/p/Cdz4B2IKTOU/?utm_source=ig_web_copy_link

नुकत्याच येऊन गेलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटातही रिंकूने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यानंतर रिंकूचा नवा चित्रपट कधी रिलीज होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, रिंकूने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. रिंकू राजगुरूने ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टला तिने कॅप्शन दिले आहे, ‘तिच्या प्रेमाचा एक नवा पैलू…’कृतिका’च्या दमदार भूमिकेत येत आहे रिंकू राजगुरू. टीजर येत आहे सोमवारी, चुकवू नका!’ १७ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाची निर्मिती राकेश राऊत आणि समीर कर्णिक, आशिष भालेराव यांनी केली आहे, तर दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांनी केले आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू हे या चित्रपटात विशेष भूमिकेत झळकणार असून, विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे. आठवा रंग प्रेमाचा’ हा चित्रपट प्रेमाचा वेगळा रंग दाखवणार आहे. त्यामुळे आजच्या काळातली आणि फ्रेश कथा प्रेक्षकांना पाहता येईल.

समीर कर्णिक यांनी ‘क्युं हो गया ना.. या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर ‘यमला पगला दिवाना’, ‘चार दिन की चांदनी’, ‘हिरोज’, ‘नन्हे जैसलमेर’ अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन केले आहे. आता त्यानी ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Share