क्रिकेटपटू दीपक चहर चढणार बोहल्यावर; प्रेमिका जया भारद्वाजसोबत १ जूनला करणार लग्न

मुंबई : टीम इंडियाचा आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज दीपक चहर लवकरच बोहल्यावर चढणार आहे. येत्या १ जून रोजी दीपक चहर त्याची प्रेमिका जया भारद्वाजशी लग्न करणार आहे.

आयपीएल स्पर्धेचा १५ वा सिझन आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. ‘प्ले ऑफ’ मधील चार संघदेखील निश्चित झाले आहेत. पुढील आठवड्यात ‘प्ले ऑफ’ चे सामने होणार असून. अंतिम सामना २९ मे रोजी रंगणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या धामधुमीतच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. दीपक चहरचा चुलत भाऊ आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकी गोलंदाज राहुल चहरने त्याची फॅशन डिझायनर मैत्रीण इशानी जोहरसोबत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२२) च्या १५ व्या हंगामापूर्वी मार्च महिन्यात लग्न केले. आता दीपक चहर आणि जया भारद्वाज यांच्या विवाहाची बातमी समोर आली आहे.

दीपक चहर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तो आयपीएलच्या १५ व्या हंगामात दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला होता. त्याला चेन्नई सुपर किंग्सने १४ कोटी रुपये मोजून खरेदी केले. मात्र, दीपकला दुखापतीमुळे या सिझनमधील एकही सामना खेळता आला नाही. त्याच्या अनुपस्थितीचा मोठा फटका चेन्नई संघाला बसला. त्यांचे आव्हान ‘प्ले ऑफ’ पूर्वीच संपुष्टात आले. या दुखापतीमुळे दीपक चहर आगामी टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार की नाही हे अद्याप अनिश्चित आहे. सध्या तो बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे.

आयपीएल स्पर्धेच्या धामधुमीतच दीपक चहरच्या लग्नाची बातमी आली आहे. तो १ जून रोजी त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाज हिच्याबरोबर लग्न करणार आहे. या दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दीपक चहर आणि जया भारद्वाज बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. हे दोघे अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. जया भारद्वाज एका खासगी कंपनीत काम करते. मागील वर्षी आयपीएलच्या प्लेऑफच्या सामन्यादरम्यान दीपकने जयाला प्रपोज केले होते. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यादरम्यान दीपक चहरने स्टेडियममध्ये सर्वांसमोर जया भारद्वाजला लग्नाची मागणी घातली होती. आता दीपक चहर आणि जया भारद्वाज लग्नबंधनात अडकणार आहेत.

दीपक चहरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये आतापर्यंत टीम इंडियासाठी २० टी-२० आणि ७ वन-डे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने अनुक्रमे २६ आणि ७ विकेट्स घेतल्या आहेत. ६३ आयपीएल सामन्यांमध्ये ५९ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. आता लग्नानंतर लवकरात लवकर टीम इंडियात कमबॅक करण्याचा दीपक चहरचा प्रयत्न असेल.

Share