यंदा आषाढी एकादशीला ‘एकनाथां’ च्या हातून होणार विठ्ठलाची महापूजा!

मुंबई : येत्या रविवारी १० जूनला आषाढी एकादशी आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथील पांडुरंगाची महापूजा करण्याचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला जातो. यंदा हा मान नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली जाणार आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले. यावेळी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन मुख्यमंत्री शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. “पूजेसाठी नक्की उपस्थित राहू आणि पंढरपूर मंदिर समितीला लागेल ती मदत करू”, असे मुख्यमंत्र्यांनी समितीच्या सदस्यांना सांगितले.

याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, पंढरपूरचु उपविभागीय अधिकारी आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव तसेच मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. ते म्हणतात की, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज माझ्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले. यासमयी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन माझा सन्मान केला.

अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून आहे तो आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज यांच्यासह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करून पालख्या ९ जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहेत. १० जुलैला आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीदिनी विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान हा अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांकडे आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी ३९ आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारले. यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

आजपर्यंत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान हा सर्वाधिक वेळा दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पूजा केली होती. मात्र, यंदाच्या पंढरपूरच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार की, देवेंद्र फडणवीस जाणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला. आता राज्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे यावर्षी शासकीय महापूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे.

Share