राज्यातील कोरोनाचा आलेख चढताच; सलग तिसऱ्या दिवशी एक हजारापेक्षा जास्त रुग्ण

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना (कोविड-१९) रुग्णांची संख्या दररोज वाढतच चालली आहे. राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी एक हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात १ हजार १३४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात राज्यात तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी राज्यात ५६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत राज्यात एकूण ७७ लाख ३७ हजार ३५५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८.०६ टक्के झाले. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार १२७ इतकी झाली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे BA4 आणि BA5 सब-व्हेरिएंटचा वेगाने प्रसार होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या राज्यात सर्वाधिक ३७३५ सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ६० टक्के सक्रिय रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. ठाणे ६५८, रायगड १०८ आणि पुणे ४०९ अशी सक्रिय रुग्णांची संख्या असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत आज ७६३ कोरोना रुग्ण आढळले तर ठाणे मनपा हद्दीत ७७, नवी मुंबई ७१, पुणे मनपा हद्दीत ७२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबई महानगरात मागील काही दिवसांमध्ये कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला संभाव्य चौथ्या लाटेचा इशारा लक्षात घेत, पावसाळा सुरू होणार असल्याने जलजन्य आजारांची शक्यता पाहता, आरोग्य यंत्रणेसह विभाग कार्यालये व सर्व संबंधित खात्यांनी सुसज्ज राहावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे कोविड संसर्ग वेळीच रोखण्यासाठी बाधितांचा शोध घेता यावा म्हणून चाचण्यांची संख्या वाढवण्याच्याही सूचना मनपा आयुक्तांनी दिल्या आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-१९ विषाणू बाधितांच्या संख्येत मागील आठवडाभरात वेगाने वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी आज (३ जून) दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशासनाची बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, कार्यकारी आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, इतर सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता; उपाययोजना करण्याच्या मुंबई मनपा आयुक्तांच्या सूचना

मनपा आयुक्त डॉ. चहल म्हणाले, कानपूर आय. आय. टी. तज्ज्ञांनी जुलै २०२२ मध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून, त्यांचा इशारा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कारण याआधीच्या कोविड लाटांबाबत त्यांनी वर्तवलेले अंदाज खरे ठरले होते. कोविड विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या अलिकडे वाढली आहे, हे लक्षात घेतले तर चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक बाबींवर पुन्हा एकदा विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक आहे. सोबतच, आता पावसाळादेखील सुरू होणार असून, पावसाळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुसज्ज राहून त्याची सक्त अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे डॉ. चहल म्हणाले.

Share