मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३ आणि ४ जुलैला विशेष अधिवेशन बोलावत नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. याच अधिवेशनात पहिल्याच दिवशी म्हणजे ३ जुलैला विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार असून, ४ जुलैला विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. दरम्यान, नव्या विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर महाराष्ट्रात काल (३० जून) बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप यांचे नवे सरकार स्थापन झाले. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा ३० जूनला संध्याकाळी राजभवनात शपथविधी पार पडला. शिंदे सरकारला तातडीने बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश राज्यपालांनी दिल्यानंतर शिवसेनेने या सत्तास्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यासंदर्भात शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईच्या याचिकेवरदेखील आजच तातडीने सुनावणी करण्याची शिवसेनेची मागणीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून, ही सुनावणी ११ जुलै रोजीच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयाने शिवसेनेला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे.
भाजपने बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला मोठा धक्का दिलेला असतानाच आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत सेनेला आणखी एक धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभा अध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. तेव्हापासून उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हेच अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक राजकीय अडथळे येत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. उद्धव ठाकरे सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परवानगी देण्याची विनंती राज्यपालांना केली होती; परंतु राज्यपालांनी ही परवानगी दिली नव्हती. या पार्श्वभूमीवर आता नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सूत्र वेगाने हलू लागली असून, रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज (१ जुलै) जाहीर करण्यात आला आहे. नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवारी (३ जुलै) आणि सोमवारी (४ जुलै) २०२२ रोजी बोलावण्यात आले आहे. या विशेष अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे.
यासंदर्भात विधिमंडळ सचिवालयाकडून आज पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार ३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी विधानसभेच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे. त्यामध्ये पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. २ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगर जिल्ह्यातील दिग्गज नेते आहेत. काँग्रेस व्हाया शिवसेनेमधून भाजपमध्ये सामील झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभा अध्यक्षपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांचेही नाव चर्चेत आहे.