पासपोर्ट परत मिळावा म्हणून आर्यन खानची न्यायालयात याचिका

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला हाय-प्रोफाइल ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गेल्या वर्षी अटक केली होती. तपासांती ‘एनसीबी’ कडून ‘क्लीन चीट’ मिळाल्यानंतरही अद्याप आर्यन खानला त्याचा पासपोर्ट परत देण्यात आला नाही म्हणून आर्यन खानने गुरुवारी विशेष एनडीपीएस न्यायालयात आपला पासपोर्ट परत मिळावा यासाठी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी येत्या १३ जुलैला होणार आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर ३ ऑक्टोबर २०२१ रोजी ‘एनसीबी’ ने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा आणि २० जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यन खानला २० दिवस तुरुंगात राहावे लागले होते. हे प्रकरण देशभरात गाजले होते. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाली.

चौकशीनंतर ‘एनसीबी’ कडून मे महिन्यात न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपी म्हणून आर्यन खानचे नाव नमूद केलेले नाही. या प्रकरणात पुरेसे पुरावे न मिळाल्याने आर्यन खान आणि अन्य पाच जणांना ‘एनसीबी’ ने नुकतीच ‘क्लीन चीट’ दिली होती. आर्यन खानने जामीन देताना लागू केलेल्या अटींचे पालन करत आपला पासपोर्ट न्यायालयात जमा केला होता. गुरुवारी (३० जून) त्याने आपल्या वकिलांच्या माध्यमातून एनडीपीएस विशेष कोर्टात पासपोर्ट परत करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. ‘एनसीबी’च्या आरोपपत्रात माझे नाव नाही. त्यामुळे माझ्या पासपोर्ट परत देण्यात यावा, अशी विनंती आर्यनने या याचिकेद्वारे न्यायालयाला केली आहे. या प्रकरणात विशेष न्यायालयाने ‘एनसीबी’ला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले असून, पुढील सुनावणी १३ जुलैला होणार आहे.

Share