भगवंत मान यांच्यावर रोड शोदरम्यान हल्ला

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली असतानाच आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार खा. भगवंत मान यांच्यावर रोड शोदरम्यान हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे. अमृतसर येथील अटारी भागातून भगवंत मान यांचा ताफा जात असतानाच गर्दीतून त्यांच्यावर दगड भिरकावण्यात आला असून त्यात मान हे जखमी झाले आहेत. भगवंत मान यांच्या चेहऱ्यावर व डोळ्याला मार लागल्याचे सांगण्यात येत असून त्यांना गंभीर इजा झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

भगवंत मान हे आज अमृतसर जिल्ह्यातील आपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. काल दुपारी अमृतसर-अटारी मार्गावर त्यांचा रोड शो होता. या रोड शो साठी मोठी गर्दी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फाही मोठ्या संख्येने समर्थक उभे होते. कारचा सनरूफ उघडून मान हे उभे राहिले होते व लोकांना अभिवादन करत ते पुढे चालले होते. त्याचवेळी गर्दीतून अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर दगड फेकून मारण्यात आला व त्यात ते जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर तातडीने मान हे जवळच्या रुग्णालयात दाखल झाले. तिथे इलाज झाल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रचार सुरू केला असल्याचे सांगण्यात आले.

Share