काँग्रेसकडून तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न; केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा आरोप

नवी दिल्ली : ‘नॅशनल हेरॉल्ड’ शी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणात ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे; पण काँग्रेस पक्षाकडून तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला. रामाचे अस्तित्व न मानणारे आता रावणाला मानू लागले आहेत, असा टोलाही इराणी यांनी काँग्रेसला लगावला.

आज सोमवारी (१३ जून) दिल्ली येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. स्मृती इराणी यांनी यावेळी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली. ‘नॅशनल हेरॉल्ड’ शी संबंधित प्रकरणात ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. काँग्रेस पक्षाकडून मात्र याचे राजकारण केले जात आहे. आज ईडीविरोधात काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहेत. नवी दिल्लीत तुम्ही कार्यकर्ते, नेत्यांना आज बोलावले आहे. कारण, गांधी कुटुंबीयांची संपत्ती वाचवायची आहे, असा हल्लाबोल इराणी यांनी गांधी कुटुंबीयांवर केला. काँग्रेस पक्ष ९० कोटी रुपये ‘एजीएल’ला कर्ज देते. ज्या पक्षाची स्थापना इंग्रजांनी केली, त्यांनी इंग्रजांवर टीका करू नये. ‘यंग इंडिया’ कंपनीने समाजसेवेचे काम केलेले नाही. अराजकता पसरवण्याचे काम काँग्रेस करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

९ कोटी रुपयांचे शेअर ‘यंग इंडिया’ला दिले गेले. राहुल गांधींचा २ हजार कोटी रुपये वाचवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही काळ्या धनाचा धंदा करावे आणि तपास संस्थांनी डोळे झाकून घ्यावे हे शक्य नाही. काँग्रेसचा संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न असल्याची घणाघाती टीका स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर केली. ईडीवर दबाव टाकून लोकशाहीचा सन्मान किती? असा सवाल इराणी यांनी गांधी कुटुंबाला आणि काँग्रेसला विचारला.

Share