भाजपला मतदान करू नये म्हणून अटकेचा प्रयत्न; आ. रवी राणा यांचा आरोप

अमरावती : विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीने दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. उद्या २० जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत मी भाजपला मतदान करू नये, म्हणून महाविकास आघाडीने मला अटक करण्यासाठी मुंबई आणि अमरावती पोलिसांना माझ्या मुंबईतील घरी पाठवले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.

आमदार रवी राणा यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसारित केलेल्या व्हिडीओतून हा आरोप केला आहे. आ. राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल करीत गंभीर आरोप केला आहे. आमदार रवी राणा म्हणाले, अमरावती येथील राजापेठ येथील उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती आणि मुंबई पोलिसांचे एक पथक मला अटक करण्यासाठी मुंबईतील खार येथील माझ्या निवासस्थानी पोहोचले; पण आपण त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने ते मला अटक करू शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावतंत्राचा हा एक भाग असून, विधान परिषद निवडणुकीत मी भाजपला मतदान करू नये, म्हणून महाविकास आघाडीने मला अटक करण्याचा प्रयत्न चालविला आहे. आपण यावर कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार आहोत.

काय आहे नेमके प्रकरण?
फेब्रुवारी २०२२ मध्ये अमरावती येथील राजापेठ भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा समर्थकांनी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकून निषेध नोंदवला होता. याप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आमदार रवी राणा यांच्यासह अकरा जणांविरुद्ध जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, सदर घटना घडली त्यावेळी आपण दिल्लीत होतो, असे आमदार रवी राणा यांचे म्हणणे आहे.

आमदार राणा यांना या प्रकरणात अमरावती जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे. हाच अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी शहर पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. याच प्रकरणात न्यायालयाने आमदार रवी राणांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. अमरावती पोलिस शनिवारी हे जामीनपात्र वॉरंट घेऊन रवी राणा यांना देण्यासाठी त्यांच्या मुंबईतील खार येथील घरी गेले होते. मात्र, आमदार रवी राणांच्या घरी कोणीही नसल्याने हे वॉरंट स्वीकारण्यात आलेले नाही.

Share