राज्यसभेसाठी संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

नागपूर : राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. संभाजीराजे यांच्या उमेदवारीचा विषय शरद पवार यांनी सुरू केला, असे म्हणत फडणवीस यांनी संभाजीराजेंच्या कोंडीसाठी शरद पवार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ते बुधवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याचे जाहीर करून सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी संभाजीराजेंना पाठिंबा जाहीर करून नंतर घूमजाव करीत राष्ट्रवादीचा पाठिंबा शिवसेना उमेदवाराला राहील, असे स्पष्ट केले. दुसरीकडे संभाजीराजेंनी शिवसेनेच्या तिकिटावर राज्यसभेची निवडणूक लढवण्यास नकार दिल्यावर सेनेने संजय पवार यांची उमेदवारी निश्चित केली आहे. संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून राज्यात आता आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवाराची घोषणा केल्यानंतर संभाजीराजेंची राज्यसभेची वाट कठीण झाली आहे. त्यावर आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, संभाजीराजेंना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्याचा विषय सर्वात प्रथम शरद पवारांनीच चर्चेला आणला होता. मात्र, नंतर हा विषय वेगळ्याच वळणावर गेला. आता राज्यसभेच्या उमेदवारीसाठी संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न दिसत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच त्यांना उमेदवारी द्यायची की नाही हा त्या-त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यावर आपण फार बोलणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

महागाईवरून शरद पवारांवर टीका
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महागाईच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर निशाणा साधला. राज्यात पेट्रोल-डिझेलवर केंद्राचा कर १९ रुपये तर राज्याचा कर २९ रुपये आहे. राज्य सरकार कर कमी करून सामान्यांना दिलासा का देत नाही, याचे उत्तर शरद पवारांनी द्यावे, असे फडणवीस म्हणाले.

राज्यातील महागाईसाठी केंद्र सरकार नव्हे तर महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे,
सगळ्यात जास्त महागाई वाढवण्याचे काम महाराष्ट्राचे सरकार करत आहे. २९ रुपये कर पेट्रोल-डिझेलवर लावून एक रुपयाही कमी न करता हे लोक महागाईवर कसे बोलू शकतात याचे मला आश्चर्य वाटते, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

Share