मुंबई : मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये मी आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. माझ्या या भूमिकांचे रसिक प्रेक्षकांनी नेहमीच कौतुक केले आहे. त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. या भूमिकांमुळे मला एक वेगळी ओळख मिळाली आहे. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे आजही मला काम करण्याची स्फूर्ती मिळते, उत्साह येतो. जोपर्यंत कलाकार, प्रेक्षक, दिग्दर्शक, निर्माते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तोपर्यंत मी कोणालाही भीत नाही, अशी प्रांजळ भावना मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
‘विनोदाचा सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा शनिवारी (४ जून) ७५ वा वाढदिवस साजरा झाला. अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीलाही पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अष्टविनायक नाट्य संस्था व परिवारातर्फे अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लीनर’ या नाटकाच्या खास प्रयोगाचे शनिवारी सकाळी दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. या प्रयोगादरम्यान अशोक सराफ यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी अशोक सराफ म्हणाले, माझ्या नाटकातील सहकलाकारांनी नेहमी कौतुक करतच मला मोठे केलेले आहे. त्यामुळे नकळतपणे मी इथवर पोहोचलो आहे आणि त्यात माझे असे काही वेगळे आहे किंवा मी काही केले आहे, असे मला वाटत नाही. याक्षणी सर्वात जास्त आभार मानायचे असतील तर ते मी प्रेक्षकांचे मानीन. कारण तुम्ही प्रेक्षक नसता तर मी नसतो. या नाटकाच्या प्रयोगाला तुम्ही आवर्जून आलात आणि आजही एकही आसन रिकामे नाही. हा एक क्षण मी कायम लक्षात ठेवेन.
मला ज्या कथा आवडतात, पटतात त्यातच मी काम करतो. आज मराठी चित्रपटांना खरे तर चांगल्या लेखकांची, उत्तम कथाकारांची आणि जे उत्तम कथा सांगत लोकांचे निखळ मनोरंजन करू शकतात, अशा व्यक्तींची गरज आहे. मात्र, आज मराठी सिनेसृष्टीत ते सगळे मागे पडत चालले आहे; परंतु जर आपल्याला वेळीच जाग आली तर उशीर झालेला नसेल, असा सल्लाही त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना दिला.
‘मी बहुरूपी’ पुस्तकाचे सुनील गावस्कर यांच्या हस्ते प्रकाशन
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पंच्याहत्तरीनिमित्ताने मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहामध्ये एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोक सराफ यांच्या ‘मी बहुरूपी’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिध्द क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ तसेच चित्रपटसृष्टीतील नामवंतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सुनील गावस्कर यांनी यावेळी अशोक सराफ यांच्याबरोबरच्या लहानपणीपासूनच्या आठवणी जागवल्या. माझा वाढदिवस अशा प्रकारे साजरा करून हा दिवस अविस्मरणीय केल्याबद्दल अशोक सराफ यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे यांनी केले.