औरंगाबाद : राज्यातील १४ महानगरपालिकांच्या निवडणुका सप्टेंबर २०२२ मध्ये होणार आहेत, तसे प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात नुकतेच दाखल केले आहे. मात्र, मुदत संपलेली असूनही औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार नाही. न्यायालयीन खटले व प्रभाग रचनेस विलंब झाल्याने औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करू, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
“ऑगस्ट २०२१ मध्ये मुदत संपुष्टात येत असलेल्या महापालिकांच्या वाॅर्ड रचनेस आयोगाने प्रारंभ केला आहे. ४ मे रोजी न्यायालयाच्या निकालानंतर ५ मे पासून आयोगाने कार्याला पुन्हा प्रारंभ केला. १७ मे पर्यंत १४ महापालिकेच्या वाॅर्ड रचनेचे काम पूर्ण होईल. अनुसूचित जाती व जमातीचे वाॅर्डनिहाय आरक्षण आणि मतदार याद्यांचे काम ३० जून पर्यंत संपणार असून त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करता येईल’,मात्र, यात औरंगाबादचा समावेश नाही, असे आयोगाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. प्रतिज्ञापत्रात औरंगाबाद मनपासंदर्भात स्वतंत्र परिच्छेद आहे. “औरंगाबाद मनपाच्या वाॅर्ड रचनेला न्यायालयाचे जैसे थेचे आदेश होते. ३ मार्च २०२२ रोजी हा खटला निकाली निघाला आहे. ९ मे रोजी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले असून १७ मेपर्यंत वाॅर्ड रचना मंजुरीसाठी आयोगाला पाठवावी, असे आदेश दिले आहेत. औरंगाबाद महापालिकेच्या वाॅर्ड रचनेचा व तत्संबंधीचा स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने म्हटले आहे.