औरंगजेबाचे उदात्तीकरण करून ओवेसींना कोणता संदेश द्यायचाय? खा. अमोल कोल्हे यांचा सवाल

पुणे : ”हैदराबादचे एक महाशय औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक झाले. ज्या शहनशाह औरंगजेबाने स्वत:च्या वडिलांचे हात-पाय तोडून त्यांना हाल हाल करून मारले. ज्यांनी आपल्या सख्ख्या भावंडांची कत्तल केली. ज्यांनी संभाजीराजेंना अनन्वित छळ करून मारले, त्यांच्या कबरीवर जाऊन एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींना नेमका काय संदेश द्यायचा आहे? या माणसाचे उदात्तीकरण करुन आपण कोणते उदाहरण समाजासमोर ठेवू पाहताय?” असा सवाल राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांना विचारला आहे.

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी (१२ मे) शेकडो कार्यकर्त्यांसह औरंगाबादेतील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तसेच दौलताबाद, खुलताबाद येथील दर्ग्यांना तसेच औरंगजेबाच्या कबरीला त्यांनी भेट दिली. औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवला. खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणाऱ्या एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. पुण्यात जश्न-ए-ईद-ए-मिलन हा या राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर सडकून टीका केली.

शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील हिंदू-मुस्लिम बांधव किती गुण्यागोविंदाने नांदत होते याचे उदाहरण देताना खा. अमोल कोल्हे म्हणाले, “शिवछत्रपतींच्या स्वराज्यामध्ये अठरा पगड जातीचे लोक जेव्हा एकत्र लढत होते. तेव्हा विचार करा, अफजल खानाचे संकट राज्यावर आले होते. तेव्हा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक सिद्धी इब्राहिम होते. आरमाराचे प्रमुख दौलत खान होते. अठरा पगड जातीचे लोक एकत्र आले होते. सगळे धर्म एकत्र आले होते, ते सगळे स्वाभिमानासाठी एकत्र आले होते, कारण छत्रपतींनी जे राज्य निर्माण केले, ते रयतेचे राज्य होते, रयतेचे कल्याणकारी राज्य त्यांनी निर्माण केले”.

“म्हणून मी कायम म्हणतो, मी कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या प्रांतात जन्मालो आलो हे माझ्या हातात कधीच नव्हते; पण दोन पर्याय आहेत, एक म्हणजे अमुक जातीत-धर्मात पंथात-प्रांतात जन्मालो आलो, याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगणे आणि दुसरा म्हणजे मी कोणत्याही जाती-धर्मात जन्मालो आलो असेन तरी माझ्या कर्तृत्वाने माजे व्यक्तिमत्त्व अशा उंचीवर नेऊन ठेवीन की, माझा माझ्या जातीला, माझ्या धर्माला आणि राष्ट्राला अभिमान वाटेल. जेव्हा ही भावना बळावते. तेव्हा राष्ट्राचे कल्याण होते; पण अतिरेकी धर्मावादावर, अतिरेकी राष्ट्रवादावर जग टिकू शकत नाही, हे जगाच्या इतिहासातून शिकायला मिळेल”, असे म्हणत खा. कोल्हे यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्या कट्टरतावादावर सडकून प्रहार केला.

“जाती धर्म हे दगड आहेत. त्याच दगडांची भिंत बांधली तर समाज तुटला जातो आणि त्याच दगडांचा पूल बांधला तर समाज जोडला जातो. समाज जोडला गेला तर भाकरीचा प्रश्न सुटतो, पोटाचा प्रश्न सुटतो. कारण पोटाला कोणताही जात-धर्म नसतो. त्यामुळे शाश्वत विकासाची वाट अव्याहतपणे ज्यांनी गेली ५५ वर्ष महाराष्ट्राला दाखवली, त्या शरद पवार यांचे आभार मानायला पाहिजेत”, असेही खा. कोल्हे म्हणाले.

Share