गुणरत्न सदावर्तेंसह ११५ एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा देत ५० हजाराच्या जाचमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी ११५ एसटी कर्मचारी आंदोलकांनाही १० हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या ८ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी घुसून आक्रमक आंदोलन केले होते. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. सदावर्ते यांना मुख्य आरोपी तर ११५ एसटी कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात आले होते. आता याप्रकरणी सदावर्ते यांना दिलासा मिळाला असून, सदावर्ते यांना ५० हजार रुपये रोख हमी आणि तितक्याच रकमेचा हमीदार तर सर्व ११५ एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या ११५ एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मिळाला असला तरी त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन घेणार की नाही याबाबत अजून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून सदावर्तेंसह ११५ आंदोलकांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याशिवाय अकोला जिल्ह्यातील अकोट सत्र न्यायालयानेदेखील सदावर्ते दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

सदावर्ते कोल्हापूर पोलिसांच्या कोठडीत
दरम्यान, मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापूर पोलिसांनी ॲड. सदावर्ते यांना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयात सुमारे तासभर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद मांडल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. पी. गायकवाड यांनी ॲड. सदावर्ते यांना सोमवारपर्यत पोलिस कोठडी सुनावली असून, सदावर्ते सध्या कोल्हापूर पोलिसांच्या कोठडीत आहेत.

Share