नवी दिल्ली : २०१४ पूर्वी देश घोटाळे आणि घराणेशाहीच्या गर्तेत अडकला होता, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. गेल्या आठ वर्षांत भाजप सरकारच्या कार्यकाळात देशाने खूप मोठी उंची गाठली आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. लहान मुलांसाठी पीएम केअर फंडांतर्गत योजनेचे लोकार्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला आज आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात अनाथ झालेल्या मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत आम्ही आज शिष्यवृत्ती प्रदान करत आहेत. अशा मुलांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी कर्जाची गरज असल्यास पीएम केअर फंडातून सरकार त्यांना मदत करेल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली.
मुलांनी अभ्यास केला तर भविष्यात आणखी पैसे लागतील. त्यांना १८ ते २३ वर्षांपर्यंत स्टायपेंड मिळेल. तुमचे वय २३ असल्यास तुम्हाला १० लाख रुपये अधिक मिळतील. कोणताही आजार झाला तर उपचारासाठी पैसे लागतील. त्यासाठी पालकांनाही याची काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला आयुष्मान कार्ड दिले जात आहे. त्यामुळे ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत.
आज आमचे सरकार आठ वर्षे पूर्ण करत आहे. या देशाचा आत्मविश्वास, देशवासियांचा आत्मविश्वास अभूतपूर्व आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये देशाने जी उंची गाठली आहे त्याची कल्पना यापूर्वी कोणी केली नसेल. आज भारताची मान जगभरात उंचावलेली आहे. आपल्या भारताची शक्ती जागतिक व्यासपीठांवर वाढलेली आहे आणि मला आनंद आहे की, हा भारताचा प्रवास युवकांच्या नेतृत्वाखाली होत आहे. २०१४ पूर्वी हजारोंचे घोटाळे, भ्रष्टाचार, घराणेशाही, देशभरात पसरलेल्या दहशतवादी संघटना, प्रादेशिक भेदभाव या सगळ्यामुळे देश एका विखारी चक्रात अडकला होता, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी याप्रसंगी मागच्या काँग्रेस सरकारवर टीका केली.