आम्हाला घोडेबाजार करायचा नाही, महाविकास आघाडीने एक उमेदवार मागे घ्यावा : फडणवीस

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. कारण आमचे तीन उमेदवार रिंगणात असून, ते निवडून येणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीने आपला एक उमेदवार मागे घ्यावा म्हणजे घोडेबाजारचा प्रश्न येणार नाही. तरीही त्यांनी उमेदवार निवडणूक रिंगणात ठेवला तरी आमचे तीनही उमेदवार विजयी होणार आहेत, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्रातून केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल तसेच राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गोयल, बोंडे आणि महाडिक यांनी आज सोमवारी विधानभवनात जाऊन राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राज्यसभा निवडणुकीत संख्याबळ नसतानाही तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून भाजपला घोडेबाजार करायचा आहे, या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले, आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, याची आम्हाला खात्री आहे. तुम्हाला घोडेबाजाराची भीती वाटत असेल तर तुम्ही उमेदवार मागे घ्या, म्हणजे घोडेबाजार होणार नाही. जरी त्यांनी उमेदवार कायम ठेवला आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही. आमचे तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. आमचे तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार सद्सद्विवेकबुद्धीने आम्हाला मतदान करतील. त्यामुळे आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असे फडणवीस यांनी म्हटले.

आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील
भाजपतर्फे राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातून तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल पुन्हा एकदा महाराष्ट्रातून निवडून राज्यसभेवर जात आहेत याचा आम्हाला आनंद आहे. त्यासोबत अनिल बोंडे यांचा कृषिविषयक अभ्यास आहे. धनंजय महाडिक यांचे सहकार क्षेत्रात मोठे काम आहे. या तिन्ही उमेदवारांचे अर्ज आम्ही भरले आहेत. मला विश्वास आहे की, आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असे फडणवीस यांनी सांगितले.

तुम्ही धनंजय महाडिक यांना कसे निवडून आणणार, असा प्रश्न यावेळी फडणवीस यांना विचारला असता, फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार विचार करूनच उतरवला आहे. तिसरा उमेदवार कसा निवडून आणणार, याबाबत आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आहे; पण त्याबद्दल मीडियात चर्चा करायची नसते, असे फडणवीस म्हणाले. गेल्या आठ वर्षांत केंद्रातील मोदी सरकारने भारताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. मध्यमवर्गीयांना पंतप्रधानांचे काम पसंत असल्याने ते आता जगाचे एक प्रसिद्ध आणि मान्यताप्राप्त नेते झाले आहेत. या आठ वर्षांमुळे नवभारताचे चित्र समोर आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेला धडा शिकवू : पीयूष गोयल

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानले. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षाकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, अशा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जोरावर आपले आमदार निवडून आणले. मात्र, नंतर आमचा विश्वासघात केला. त्यामुळे या निवडणुकीतून शिवसेनेला धडा शिकवणार असल्याचे गोयल म्हणाले.

सहाव्या जागेसाठी चुरस
दरम्यान, राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होत आहे. सध्याच्या संख्याबळानुसार दोन जागांवर भाजप आणि प्रत्येकी एका जागेवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. भाजपचे १०६ आमदार असून, पक्षाकडे २२ अतिरिक्त मते आहेत. मात्र, सहावी जागा जिंकण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या जागेवरून चुरस निर्माण झाली आहे.

Share