बंगाली अभिनेत्री विदीशा मुजुमदारचा मृत्यू; राहत्या घरीच आढळला मृतदेह

कोलकाता : टीव्ही मालिका क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवलेल्या पल्लवी डे हिच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच २१ वर्षीय प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री व मॉडेल विदीशा डे मुजुमदारच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री विदीशा डे मजुमदार हिचा मृतदेह कल बुधवारी तिच्या घरात आढळून आला आहे. विदीशाच्या मृत्यूची बातमी कळताच बंगाली चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

२१ वर्षीय मॉडेल-अभिनेत्री विदीशा डे मजुमदार ही कोलकाता येथील नगरबाजार परिसरात आपल्या आई-वडिलांसह भाड्याने एका घरात राहत होती. बुधवारी २५ मे २०२२ रोजी सायंकाळी विदीशाचा मृतदेह तिच्या राहत्या घरात एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र, तिने आत्महत्या केली की, तिची हत्या करण्यात आली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

https://www.instagram.com/p/CZ6RlAGv01M/?utm_source=ig_web_copy_link

पोलिस सध्या अधिक माहितीसाठी तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींची तसेच कुटुंबातील मंडळींची चौकशी करत आहेत. विदीशाने आत्महत्या केली असल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे; पण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच विदीशाच्या मृत्यूचे खरे कारण समोर येऊ शकेल. असे पोलिसांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वीच बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिने आत्महत्या केली होती. आता विदीशा डे मुजुमदारच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. मॉडेलिंग क्षेत्रात विदीशाने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. अनिरबेद चटोपाध्याय यांच्या ‘भार : द क्लाउन’ या लघु चित्रपटामध्ये तिने काम केले होते. टीव्ही मालिका क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिने नावलौकिक मिळवला होता.

Share