…तरीही ‘जाणते राजे’ म्हणतात, माझा मलिकांवर विश्वास आहे : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका

अहमदनगर : कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय ‘ईडी’ची कारवाई होत नाही. नवाब मलिकांच्या प्रकरणावरून हे सिद्ध झाले आहे. कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमशी नवाब मलिकांचे संबध असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. मात्र, तरीही ‘जाणते राजे’ म्हणताहेत माझा त्यांच्यावर विश्वास आहे. अतिरेकी कारवाईचे समर्थन केले जात आहे, हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे नेते आणि माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.

राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या शासकीय आणि खासगी निवासस्थानांसह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर ‘ईडी’ने केलेल्या कारवाईवरून भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल परब यांच्या मालमत्तांवर ‘ईडी’ने केलेल्या कारवाईबद्दल बोलताना विखे पाटील म्हणाले, हे महाविकास आघाडी नाही तर हे महाभ्रष्टाचारी सरकार आहे. परिवहनमंत्र्यावर पडलेल्या छाप्याची गाडी किती दूर जाईल माहीत नाही, असे सूचक वक्तव्य विखे पाटलांनी केले.

राज्याचे नेतृत्वच असंवेदशील झालेय
राज्यातील महाविकास आघाडी सरकार समान विकास कार्यक्रमावर एकत्र आले नाही, तर समान लुटीच्या कार्यक्रमावर आले आहे. राज्यात फक्त लूट सुरू असून, राज्यातील सामान्य जनता याचे परिणाम भोगत आहे. सरकारने लोकांचा अधिक अंत पाहू नये. सगळ्या भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवून देत मुख्यमंत्र्यांनी आपला दर्जा टिकवला पाहिजे. मात्र, राज्याचे नेतृत्वच असंवेदशील झाले आहे, अशी टीका विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

संजय राऊतांचे मनोबल अगोदरच संपलेले आहे
अनिल परब यांच्या संदर्भातील कारवाईनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे सर्व काही महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी होत असून, अशा कारवायांमुळे आमचे मनोबल संपणार नसल्याचे म्हटले आहे. त्यावर बोलताना विखे पाटील यांनी, संजय राऊत यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. त्यांचे मनोबल अगोदरच संपलेले आहे, असा खोचक टोला राऊत यांना लगावला.

शरद पवारांनी भाजपचे समर्थन केले तर आश्चर्य वाटू नये

ज्ञानवापी मशीद आणि मंदिरासंदर्भात सुरू असलेल्या वादावरून भाजप देशात जातीवाद पसरवत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचादेखील विखे पाटलांनी समाचार घेतला. २०१४ साली मतमोजणी सुरू असतानाच राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला होता याची आठवण करून देत, तेव्हा यांना भाजप जातीवादी वाटले नाही, असे विखे म्हणाले. शरद पवारांना सोयीप्रमाणे भूमिका बदलताना जनतेने बघितले आहे. काळाच्या ओघात ते उद्या भाजपचे समर्थन करायला लागले तर आश्चर्य वाटू नये, असा टोला विखे पाटलांनी शरद पवारांना लगावला.

Share