जुनपासून औरंगाबादकरांना मिळणार ४ दिवसाआड पाणी ?

औरंगाबाद : शहरात सध्या पाण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण देखील सुरु आहे. अशातच आता मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी महत्वाची माहिती दिली आहे. शहरावरील पाणीसंकट दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुरू केलेली कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे जून महिन्यापासून शहराला चार दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले आहे.

शहरातील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. या कामांचा बुधवारी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले, शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कामे सुरू आहेत. हर्सूल तलावातून पाइपलाइन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पाच एमएलडी पाणी वाढणार आहे. रोजाबाग येथील नहर-ए-अंबरची लाइन सुरू केल्याने त्यातून एक एमएलडी पाणी वाढले. जायकवाडीतून पाच एमएलडी पाणी वाढले आहे. सध्या अकरा एमएलडी पाणी वाढले आहे. एमआयडीसीने तीन एमएलडी पाणी दिल्याने टॅंकरचे पाणी वाचले आहे. सध्या सिडको एन-१ येथून ६१ टॅंकरच्या २८५ फेऱ्या होत आहेत. त्यामुळे सध्या शहराला पाच दिवसांआड समान पाणीपुरवठा केला जात आहे. जूनपासून पाणीपुरवठा चार दिवसांआड करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, असे पांडेय यांनी सांगितले आहे. परंतु, आतापर्यंत महापालिकेने पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याची जेवढी आश्वासने दिली, ती सर्व फोल ठरली आहेत. त्यामुळे जूनपासून चार दिवसांआड पाणी देण्याच्या आश्वासनाच काय होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

Share