भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली  : आम आदमी पार्टीचे भगवंत मान यांनी पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील उपस्थित होते.

भगवंत मान यांनी शहीद भगतसिंह यांच्या जन्मभूमीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी, इश्क करना है तो वतन से करो… असे म्हणत देशभक्तीपर शायरीही ठोकली. इश्क करना सबका पैदाईशी हक है, क्यूंना इस बार वतन की सरजमीं को मेहबुब बना लिया जाए.. असे त्यांनी म्हटले. तसेच, नवनिर्वाचित सर्वच आमदारांना मी आवाहन करतो की, सर्वांचा आदर करा, अरोगंट होऊ नका. ज्यांनी आपणास मतदान केलं नाही, त्यांच्याशीही आदराने वागा, असा सल्लाच नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी आपच्या सर्वच आमदारांना दिला.

दरम्यान शपविधी सोहळ्याला जवळपास २ लाख नागरिक उपस्थित होते, असा अंदाज आहे. पुरुष पिवळ्या रंगाच्या पगडीत तर महिलाही याच रंगाची ओढणी ओढून शपथविधी सोहळ्याला उपस्थित होत्या. या सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आपल्या सर्व कॅबिनेट सह उपस्थित होते. भगवंत मान यांची मुलगी सीरत कौर मान आणि मुलगा दिलशानही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
Share