दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न – नाना पटोले

मुंबई : देशातील जनता महागाईने त्रस्त असताना केंद्र सरकारने जिवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून गोरगरिबांच्या तोंडातला घास हिरावून घेतला. केंद्र सरकारला मात्र महागाई दिसत नाही. बेरोजगारी वाढली असून अग्निपथ योजना आणून तरूणांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जनतेच्या या पश्नांवर जाब विचारण्यासाठी राजभवनला घेरोओ घालण्याचे काॅँग्रेसने घोषित केले असता राज्यातील ईडी सरकराने रात्रीपासून काॅंग्रेस नेते व कार्यकर्त्यांची धरपकड केली. विधान भवनातून आंदोलनासाठी जात असतानाच काॅंग्रेस नेत्यांना पोलिसांनी अटक केली. ईडी सरकराने दंडेलशाहीच्या जोरावर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला पण अशा कारवायांना घाबरत नाही, जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करतच राहू अशा इशारा काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राजभवन घेराओ व जेलभरो आंदोलनाची हाक दिली होती पण पोलियांनी मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक केली. पोलिसांनी गुरुवारी रात्रीपासूनच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. मुंबई आणि परिसरातून १० हजाराहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. विधान भवनातून बैठक आटोपून राजभवनाचा घेराओ करायला निघालेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, माजी मंत्री प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आमदार अमर राजूरकर, वजाहत मिर्झा, अभिजीत वंजारी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे यांना पोलिसांनी विधानभवन परिसरातून अटक केली. तर मलबार हिल परिसरातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस राजेश शर्मा यांना अटक केली.

नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसने देशभर आंदोलन करत असताना दिल्लीत काँग्रेस नेते राहुलजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांना पोलिसांनी दंडेलशाही करत ताब्यात घेतले. प्रियंकाजी गांधी यांना पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत आक्षेपार्ह व निंदनीय आहे. काँग्रेस पक्ष भाजपा सरकारच्या या पोलीसी दंडेलशाहीचा निषेध करत आहे. लोकशाहीमध्ये जनतेचे प्रश्न मांडणे गुन्हा नाही पण नरेंद्र मोदींचे सरकार लोकशाही मानत नसून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, ब्रिटिश राजवटीत सुद्धा आंदोलन करता येत होते. आपण लोकशाहीत आहोत पण राज्य सरकार जनतेच्या प्रश्नावरील आंदोलन करण्यापासूनही रोखत आहे. केंद्र सरकारने मुलांच्या दुधावर जीएसटी लावला, मीठवर, पीठावरही जीएसटी लावला. महागाईने जनता त्रस्त असताना सरकारला जाब विचारायचा नाही का ? हे कसले सरकार.. ED सरकारच्या राज्यात आंदोलन करण्यावरही बंदी आहे का? ब्रिटिशांच्या काळातही लोकशाही पद्धतीने आंदोलन करायला बंदी नव्हती, असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. महागाई, बेरोजगारी, जीएसटी, अग्निपथ योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर काँग्रेसने राज्यभर आंदोलन करून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात नारेबाजी केली.

Share