राज्यात भाजप आक्रमक तर काॅग्रेसकडून सारवासारव

मुंबई : काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका वक्तव्यावरुन नवीन वादाला सुरुवात झाली आहे. मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. असं विधानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

या प्रकरणी राज्यातील भाजप आता आक्रमक झाली आहे. भाजप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुर येथील कुही पोलिसात नाना पटोले यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

नाना पटोले यांनी समाजात तेढ निर्माण करणयाचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर देशद्रोह करणे, पंतप्रधानांना मारण्याचं प्लॅनिंग करणं, लोकांना उकसवणं, पंतप्रधानांच्या जीवाला धोका होईल अशी वर्तणूक करण्याचं काम पटोले यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि लोकांना उकसवण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बावनकुळे यांनी केलीय.

नाना पटोले व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणाले?

मी का भांडतो मी आता मागील ३० वर्षापासून राजकारणात आहे. लोक पाच वर्षाक आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, काॅलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे.

 

भाजपचे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांना पटोले यांच्या विरोधात भंडारा शहर पोलिस स्टेशमध्ये तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तक्रार घेतली असुन चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. जर पटोले  यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर कोर्टात धाव घेऊ, असा इशारा खा. मेंढे यांनी दिला.

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये  म्हणतात, काॅग्रेसचे नाना पटोले यांना समुपदेशनाची गरज आहे.  काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाजी यांचा मोदीद्वेष नवा नाही. या द्वेषापोटी आपण काय बोलतो आहोत याचे भान त्यांना राहिलेले नाही.

 

मा. मोदींजीच्या विरोधात वारंवार गरळ ओकल्याने आपल्याला राहुल गांधी ‘बक्षिसी’ देतील या समजापोटी ते वारंवार बेताल होऊ लागले आहेत. आज नानाजी जे काही बोलले आहेत ते पाहता त्यांच्या ‘समुपदेशना’ची गरज आहे असं दिसतं आहे. यापेक्षा त्यांच्या वक्तव्यावर वेगळया मार्गाने व्यक्त होता येणे अवघड आहे. असंही उपाध्ये म्हणाले.

काॅंग्रेसने आरोप फेटाळले 

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, गावगुंडांपासून लोकांचं संरक्षण करणं हा काही गुन्हा आहे का? नाना पटोले हे कुठे भाषण देत नव्हते, ते लोकांच्या गराड्यात होते, लोकांच्या तक्रारी ऐकत होते. भंडारा जिल्ह्यात मोदी असं टोपणनाव असलेला गावगुंड आहे. त्याविषयी ते बोलत होते. शिव्या देणं मारणं ही काॅँग्रेसची संस्कृती नाही. ही भाजपची संस्कृती आहे.

 

वादा नंतर सारवासारव

जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे त्यामध्ये लोक माझ्या सभोवताली गोळा झालेले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरु आहेत. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते. त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि मिळाला तर मारुही शकतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही,अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

Share