मुंबई : भाजपचे आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. दोन दिवसांपूर्वी आशिष शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून तक्रार केली आहे.
आशिष शेलार यांना २०२० मध्ये यापूर्वीदेखील धमकी देण्यात आली होती. त्यावेळी वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून एकाला अटक केली होती. आता, पुन्हा एकदा त्यांना धमकी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांना एका अज्ञात व्यक्तीकडून कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. फोनवरून धमकी देणारी व्यक्ती ही अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत असल्याचे सांगण्यात येत आहे. आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना काल पत्र लिहून तक्रार केली आहे. आशिष शेलार आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहून झालेल्या प्रकाराची माहिती देतील आणि कारवाई करण्याची मागणी करतील, असे देखील कळतय.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
आशिष शेलार सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात आणि सरकारचा भ्रष्टाचार, सरकारमधला अनागोंदी कारभार ते सातत्याने बाहेर आणतात, संघर्ष करतात. त्यामुळे कदाचित अशा प्रकारची धमकी आली असेल. पोलिसांनी ही धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.