‘धरण उशाला अन् कोरड घशाला’, औरंगाबादेत पाणी प्रश्नावर भाजप-मनसेचे संयुक्त आंदोलन

औरंगाबाद : शहरात पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. मराठवाड्यातील मोठे जायकवाडी धरण हे शहरापासून अवघ्या ५० किलोमीटरवर असताना बऱ्याच भागात ८ ते १० दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत आहे. काही ठिकाणी तर ड्रेनेजचे पाणी मिश्रित पाणी पुरवठा होत आहे. यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी करुनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने अखेर सिडकोतील नागरिकांनी कालपासून एन-७ येथील पाण्याच्या टाकीसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या या आंदोलनात भाजप आणि मनसे देखील सहभागी झाले आहे.

सिडको-हडको भागात अद्याप पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने शुक्रवारी भाजप, मनसेतर्फे पदाधिकाऱ्यांनी सकाळी १०.३० वाजेपासून ठिय्या आंदोलन केले. यावेळी पाणी द्या पाणी द्या, हल्लाबोल हल्लाबोल, महापालिका प्रशासकांचे करायचे काय…अशा घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन अद्यापही सुरु आहे. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समजूत घातली पण आंदोलक ठाम आहेत.  आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केणेकर, मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, माजी जिल्हाध्यक्ष बस्वराज मंगरूळे, माजी नगरसेवक शिवाजी दांडगे, नितीन चित्ते, महेश माळवदकर, राजगौरव वानखेडे, सरचिटणीस समीर राजूरकर, सतीश खेळकर, विकास पाटील, सोहन प्रधान, चंदु नवपुते, गणेश साळुंके, अविनाश फोकळे, अनिकेत निलावर, सागर पाटील, भदाने पाटील, राजू शेजवळ, मंदा शेजवळ, माधुरी अदवंत, सरीता घोडतुरे, पुजा सोनवणे, अभय देशमुख, राहुल बोधनकर, मुकेश जैन सहभागी झाले होते.

जो पर्यंत स्वच्छ आणि वेळेवर पाणी मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरुच राहील, अशा इशारा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी यावेळी दिला. तर, शहरातील अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांची मारामार सुरु आहे. आता जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकरांनी सांगितले. तसेच हे आंदोलन राजकीय नसून, जनतेचे आंदोलन असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

 

Share