विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहूल नार्वेकरांना उमेदवारी

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजपने धक्का तंत्राचा अवलंब करत मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत दाखल केला.

भाजप आ. राहुल नार्वेकर हे ४५वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यास ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील. राहुल नार्वेकर हे एकेकाळचे शिवसेनेचेच खंदे नेते होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत. राहुल नार्वेकर यांना भाजपाने विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करत आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे.

 

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. हे अधिवेशन ३ आणि ४ जुलैला होणार आहे. सुरुवातील २ आणि ३ जुलैला अधिवेशन बोलावलं होतं. मात्र, आता हे अधिवेशन ३ आणि ४ जुलैला बोलावण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी येणार असल्याची माहिती मिळत आहे.

राहुल नार्वेकर कोण आहेत?

राहुल नार्वेकर हे मुंबईतून भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. नार्वेकर आधी शिवसेनेत होते, परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळणारे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल नार्वेकर यांनी अचानक पक्ष सोडल्याने मोठा भूकंप झाला होता.

Share