भाजपचा महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव – काॅंग्रेस

मुंबई : महाराष्ट्रात विविध राज्यातील लोक रोजगारासाठी येत असतात. उत्तर भारतीयांनी मुंबईसह महाराष्ट्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कष्ट, मेहनत करून ते आपले पोट भरतात व गावातील घरच्यांनाही आर्थिक मदत करतात परंतु उत्तर भारतीय व महाराष्ट्रामुळे देशात कोरोना पसरला म्हणून पंतप्रधान मोदींनी केलेला अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही. काँग्रेस पक्ष सदैव उत्तर भारतीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री, प्रदेश पदाधिकारी तसेच जिल्हा अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांच्यासह उत्तर भारतीय सेलचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सार्वजिनक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मुंबईसह महाराष्ट्रात विविध राज्यातील लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. यापूर्वीही काही राजकीय पक्षांनी उत्तर भारतीयांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोरोना पसरवला असा आरोप महत्वाच्या पदावरील व्यक्तीने करुन त्यांचा अपमान केला. कोरोना काळात महाराष्ट्रातून ८४२ रेल्वेच्या माध्यमातून लाखो लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचे काम महाराष्ट्र सरकारने केले आहे. पण भाजपाकडून महाराष्ट्र व उत्तर भारतीयांना बदनाम करण्याचे काम केले.
प्रदेश काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांनी यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राने उत्तर भारतीयांना सन्मानाची वागणूक देऊन सर्व सुरक्षा व सुविधा दिली. कोरोना काळात महाराष्ट्राने साथ दिली व लाखो लोकांना गावी पाठवण्यास मदतही केली. परंतु महाराष्ट्र व उत्तर भारतीयांनी पंतप्रधान मोदींनी अपमान करुन स्वाभिमानाला ठेच पोहचवली. उत्तर प्रदेश आई तर महाराष्ट्र आमची मावशी आहे. ज्या मोदींनी आमच्या स्वाभिमान दुखावला त्यांचा अहंकार आम्ही उतरवू. मुंबईतील उत्तर भारतीय आपल्या गावातील नातेवाईकांना एक लाख पत्र पाठवणार आहेत. या पत्रातून उत्तर भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या आहेत, असे अग्निहोत्री म्हणाले.
Share