काॅंग्रेसनं आंदोलन थांबवलं, नाना पटोलेंची घोषणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत महाराष्ट्राचा अपमान केल्याचं सांगत, त्याच्या निषेधार्थ देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचं काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं होतं .तर फडणवीसांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशारा भाजपने देखील दिला होता. दरम्यान आंदोलनासाठी निघालेल्या नाना पटोले यांना पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आंदोलन थांबवत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं. मात्र, आजचं आंदोलन थांबलं असलं तरी पंतप्रधानांनी माफी मागावी या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं पटोले यांनी सांगितलं.

मोदी यांनी शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला तरी चालेल. पण, त्यांच्याविरोधात काहीही ऐकून घेतले जाणार नाही ही भाजपची भूमिका आहे. त्यामुळे ते मोदी यांच्या वक्त्यव्याला समर्थन देत आहेत. यावरून भाजप संस्कृती आज कळाली, असा टोला पटोले यांनी लगावला.  भाजपचा चेहरा लोकांच्या लक्षात आला आहे. त्यांच्या या गुंडगिरीचे परिणाम त्यांना आगामी काळात भोगावेच लागणार आहे. भाजपविरोधात  आमचे आंदोलन सुरूच राहील. पण, मुंबई करांची होणारी गैरसोय पाहून हे आंदोलन थांबविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Share