कर्नाटकात बोलेरो जीपला भीषण अपघात; ६ ठार

बंगळुरु : कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील हुन्सूर येथे लग्न समारंभ उरकून गावी परतणाऱ्या बोलेरो जीप झाडाला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात जीपमधील सहा जण जागीच ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

म्हैसूर जिल्ह्यातील हुन्सूर तालुक्यातील कलबेट्टा रोडवर आज हा भीषण अपघात घडला. म्हैसूर जिल्ह्यातील हुन्सूर येथे लग्न समारंभ उरकून बोलेरो जीपमधून एकूण नऊ जण पालीबेट्टा (जि. कोडूगू) येथे परत जात होते. वाटेत कलबेट्टा रोडवर बोलेरो जीप झाडावर आदळल्याने जीपमधील सहा जण जागीच ठार झाले. बोलेरो जीपचालक संतोष (वय ४२), अनिल (वय ४४), बाबू (वय ४८), राजेश (वय ४०), दयानंद (वय ४२) आणि विनीत (वय ३७) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. हे सर्व जण पालीबेट्टा येथील रहिवासी आहेत. या अपघातात जीपमधील इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी म्हैसूर येथील केआर रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Share