दिल्लीत कोरोनाचे थैमान

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने देशाची राजधानी दिल्लीत सध्या थैमान घातले आहे. ओमिक्रॉन (Omicron) च्या BA 2.12 व्हेरिएंटसह इतर आठ उपप्रकार दिल्लीत आढळले असून, नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या अभ्यासानंतर ही बाब समोर आली आहे.

जानेवारी ते मार्चदरम्यान दिल्लीत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांपैकी ९७ टक्के लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली होती, अशी माहिती याआधी बुधवारी एका अहवालातून समोर आली होती. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने सरकार आणि नागरिकांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बुधवारी दिल्लीत कोरोनाचे १००९ रुग्ण आढळले असून, एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे.

गुरुवारी जीनोम सिक्वेन्सिंगच्या अभ्यासात धक्कादायक बाबी समोर आल्या. सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की, नवी दिल्लीतील कोरोना चाचणीच्या नमुन्यांच्या अभ्यासात ओमिक्रॉनचे एकूण ९ प्रकार समोर आले आहेत. ज्यात BA.2.12.1 देखील आहे. ओमिक्रॉनचे BA.2 उप-प्रकार BA.1 पेक्षा जास्त संसर्गजन्य आहेत. मात्र, काळजी करण्यासारखे फार काही नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) फेब्रुवारीमध्ये सांगितले होते. आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने BA.1, BA.1.1, BA.2, BA.4, BA.5 हे ओमिक्रॉनचे पाच उपप्रकार त्यांच्या वॉच लिस्टमध्ये ठेवले आहेत. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे; परंतु कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या रुग्णालयातील ९९ टक्के बेड रिकामे आहेत.

Share