अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघ आक्रमक

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी इस्लामपूर येथे झालेल्या सभेत ब्राह्मण समाजावर टीका केल्याने ब्राह्मण समाज आक्रमक झाला असून, मिटकरींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात ब्राह्मण महासंघातर्फे राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परिवार संवाद यात्रेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे झालेल्या सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणात एक किस्सा सांगताना ब्राह्मण समाजावर टीका केली होती. या सभेतील मिटकरींच्या वक्तव्याच्या विरोधात पुण्यात ब्राह्मण महासंघाने आज राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. मिटकरींनी भाषणात लग्नविधीबाबत चुकीचा मंत्र सांगितला. त्यांच्या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या असून, त्यांनी तातडीने ब्राह्मण समाजाची माफी मागावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे.

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले, अमोल मिटकरी हे मूर्ख आहेत. ते ब्राह्मण समाजाविरोधात बोलले आहेत, असे आम्ही म्हणतच नाही. त्यांनी कोणत्याही समाजाचे नाव घेतलेले नव्हते; पण त्यांनी हिंदू धर्मातील एक मंत्र चुकीच्या पद्धतीने वापरला यावर आमचा आक्षेप आहे. मी माझी बायको पुरोहिताला देत आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. हे चुकीचे आहे. हेच विधान ते नमाजविरोधात बोलू शकतील का? हिंदू धर्माचे त्यांनी विडंबन केल्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करत आहोत.

अमोल मिटकरी काय म्हणतात…

या आंदोलनाविरोधात स्पष्टीकरण देताना अमोल मिटकरी म्हणाले, “माझं भाषण जर पूर्ण ऐकलं असेल तर त्यामध्ये कुठल्याही समाजाचा उल्लेख केलेला नाही. मी कोणाबद्दलही अपशब्द बोललेलो नाही. मी तिथं एका गावातील कन्यादानाच्या प्रसंगाचं उदाहरण देऊन मंत्रोच्चाराचा उल्लेख केला. यामध्ये कोणालाही त्रास होण्याचं कारण नाही. त्यामुळं भाषणाचा विपर्यास करुन वेगळ्या पद्धतीनं वळण देण्याचं कटकारस्थानं केलं जात आहे. ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत, त्यांनी माझा व्हिडीओ पूर्णपणे तपासावा. मी कोणत्याही समाजाचे नाव घेतलेले नाही. मी एका गावात कन्यादान सुरू असताना तिथे विरोध केला. कन्या हा काही दान करण्याचा विषय नाहीये. कन्यादान करत असताना स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चार केला, त्याचा अर्थ फक्त समजावून सांगितला. यांनी त्याला वेगळा जातीय किंवा राजकीय रंग देण्याचे काम करू नये. माझ्या विधानाचा विपर्यास करण्याचे काम विरोधकांकडून होतेय. ”

…तर मी माफी मागायला तयार
“मी संस्कृतचा जाणकार आहे. मला काही प्रश्न समजले नसतील, तर त्याचे मी उत्तर मागू शकतो. काही संघटना माफी मागा म्हणत आहेत. कशाची माफी मागायची? जे मला माफी मागा म्हणतायत, त्यांना माझा साधा प्रश्न आहे. आपल्या राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल जे बोलले, त्यावर तुम्ही काही बोलले नाही. मी राजकारणात नंतर आहे, माझा पिंड समाजकारणाचा आहे. राजमाता जिजाऊंची ‘राजा शिवछत्रपती’मध्ये जी बदनामी केली गेली, यावर या लोकांनी माफी मागावी. त्यानंतर मी माफी मागायला तयार आहे”, असे मिटकरी म्हणाले.

Share