मैत्रिचा हात पुढे करून राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसलाय

भंडारा : राज्यात गेल्या अडीच वर्षापासून सत्तेवर असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्षांमधील अंतर्गत वाद आता समोर येताना दिसत आहेत. नुकत्याच भंडारा गोंदियात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काॅंग्रेसला सोबत न जात राष्ट्रावादी काॅँग्रेसने भाजपसोबत आघाडी केल्याने काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतापले आहेत. तसेच त्यांनी ट्वीट करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर पाठीत सुरा खुपसल्याचा आरोप केला आहे.

नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातत्याने कुरघोड्या सुरू असल्याचा आरोप केला आहे. मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असं ट्वीट नाना पटोले यांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली. स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडीच्या ताब्यात असाव्यात, अशी भूमिका ठरली होती. पण भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीने भाजपासोबत हातमिळवणी करून पाठीत खंजीर खुपसला. भिवंडीतही आमचे १९ नगरसेवक राष्ट्रवादीत घेतले. मैत्री करायची तर प्रामाणिक करायची. शत्रुत्व करायचं तर ते समोरून केलं पाहिजे. सोबत राहून अशा प्रकारे वर्तन केलं जात असेल तर हे बरोबर नाही. मी हायकमांडशी चिंतन शिबिरात चर्चा करेन. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे राष्ट्रवादी आमच्यासोबत वागतेय, ते बरोबर नाही, असं नाना पटोले म्हणाले.

Share