खा. नवनीत राणा यांना Y प्लस दर्जाची सुरक्षा

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय (Y) प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. खा. नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा अहवाल आहे. त्याची गांभीर्याने दखल घेऊन खा. नवनीत राणा यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. संपूर्ण देशात कुठेही फिरताना आता खा. नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाचे सुरक्षा कवच मिळणार आहे.

केंद्र सरकारने प्रदान केलेल्या या सुरक्षा व्यवस्थेत एसपीओ, एनएसजीचे कमांडो, सीएसएफचे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा पुरविण्यात येणार आहे. हे सुरक्षा पथक खासदार नवनीत रवी राणा यांच्या समवेत २४ तास राहणार आहे. खा. नवनीत रवी राणा या सातत्याने लोकसभेत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत असतात. तसेच त्या देशातील अनेक गंभीर प्रश्नांना वाचा फोडत असतात. याबरोबरच त्या अनेक ज्वलंत मुद्द्यांना हात घालतात. त्यामुळे त्यांचा जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्रालयाला दिला होता. त्याची गांभीर्याने दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खा. नवनीत रवी राणा यांच्या सुरक्षेसाठी ही वाय प्लस सुरक्षा यंत्रणा प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या या निर्णयामुळे खा. नवनीत रवी राणा यांचा व्हीव्हीआयपी (अति महत्वाच्या व्यक्ती) श्रेणीत समावेश झाला आहे. यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांना सुध्दा अशा प्रकारे सुरक्षा पुरविण्यात आली होती.

खा. नवनीत राणा यांचे हे वाय प्लस सुरक्षा पथक आज अमरावतीत दाखल होत आहे. या पथकात एकूण ११ कमांडो असतील. केंद्र सरकारने खा. नवनीत राणा यांच्याकडे कुठलेही पद नसताना त्यांना वाय प्लस सुरक्षा दिल्याने अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

 

Share