मुंबई : काश्मीरमधील चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्टशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने मुंबईसह देशातील सात वेगवेगळ्या शहरांमध्ये १४ विविध ठिकाणी छापे टाकत शोध मोहीम सुरू केली आहे. सीबीआयने मुंबई, जम्मू, श्रीनगर, नोएडा, दिल्ली, तिरुवनंतपुरम (केरळ) आणि दरभंगा (बिहार) या शहरात वेगवेगळ्या १४ ठिकाणी छापेमारी करत चौकशी सुरू केली आहे.
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) च्या पथकांनी गुरुवारी सकाळी जम्मू-काश्मीरचे आयएएस अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या घरावर छापे टाकले. कृषी उत्पादन आणि शेतकरी कल्याण विभागाचे प्रधान सचिव नवीन चौधरी, चिनाब व्हॅली प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन लिमिटेडचे माजी अधिकारी यांच्यावरही छापे टाकण्यात आले आहेत. सीबीआयने काही दिवसांपूर्वी चिनाब व्हॅली पॉवर प्रकल्पावर केंद्र सरकारची नियमावली डावलून अयोग्यरित्या पैसे गोळा केल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात हे छापे टाकण्यात आले आहेत. हा घोटाळा ९ हजार कोटींचा असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याचीही चौकशी सुरू आहे.