दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली आहे. सीबीआयकडून सध्या एकाच वेळी २० ठिकाणी छापमारी करण्यात येत आहे. याबद्दल खुद्द मनीष सिसोदिया यांनीही ट्विट करून ही माहिती दिली आहे. मी सीबीआयचं स्वागत करतो. चौकशीत पूर्ण सहयोग करेल, जेणेकरून सत्य लवकरच बाहेर येईल, असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

मनीष सिसोदिया यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे, की आतापर्यंत अनेकदा माझ्यावर केस केल्या गेल्या, मात्र काहीच समोर आलं नाही. यावेळीही असंच होणार. देशातील चांगल्या शिक्षणासाठीचं माझं काम थांबवलं जाऊ शकत नाही. आम्ही लाखो मुलांचं भविष्य बनवत आहोत. मात्र, हे अतिशय दुर्दैवी आहे, की आपल्या देशात जो चांगलं काम करतो, त्यालाच त्रास दिला जातो. याच कारणामुळे आपला देश कधी नंबर १ बनू शकला नाही, असं त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

 

दुसऱ्या ट्वीटमध्ये सिसोदिया यांनी लिहिलं आहे की, आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करु जेणेकरुन सत्य लवकर समोर येईल. आतापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र काहीही निष्पन्न झालेलं नाही. त्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझं काम थांबवता येणार नाही.

 

पुढच्या ट्वीटमध्ये मनिष सिसोदिया म्हणतात की, दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हे लोक त्रस्त आहेत. त्यामुळेच शिक्षण, आरोग्याचे चांगले काम बंद पडाव, म्हणून दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. आमच्या दोघांवर खोटे आरोप आहेत. न्यायालयात सत्य बाहेर येईल.

दरम्यान, सीबीआयची ही कारवाई दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणाशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. वास्तविक, अलीकडेच दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. हा अहवाल ८ जुलै रोजी एलजीला पाठवण्यात आला होता.मुख्य सचिवांच्या अहवालानंतर एलजी व्हीके सक्सेना यांनी हे पाऊल उचलले आहे. या अहवालातील मनीष सिसोदिया यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. नव्या धोरणामुळे दिल्ली उत्पादन शुल्क कायदा आणि दिल्ली उत्पादन शुल्क नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप अहवालात करण्यात आला आहे. याशिवाय, दारू विक्रेत्यांचे परवाना शुल्क माफ केल्यामुळे सरकारचे १४४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.

Share