जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार

मुंबई : आज दहीहंडी असून  कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (गुरुवार १८ ऑगस्ट २०२२) विधानसभेत केली होती. या घोषणेनुसार राज्यातील सर्व  शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये,  महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षीपासून दर वर्षासाठी लागू राहील.

यंदा राज्य सरकारने दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी आधीच जाहीर केली आहे. तसेच, गुरुवारी राज्य सरारने दहिहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करत गोविंदा पथकांना सुखद धक्का दिला. या खेळात सहभागी खेळाडू अर्थात गोविंदांना शासकीय योजनांचा लाभही मिळणार आहे. गोविंदा उत्सवाचा समावेश क्रीडा प्रकारात करुन प्रो गोविंदा स्पर्धा राबवण्यात येणार आहे. या स्पर्धा राज्य शासनाकडून सुरू झाल्यास स्पर्धकांना बक्षीसाची रक्कम ही शासनाकडून मिळेल.

याचबरोबर, इतर खेळांप्रमाणे या गोविंदांना देखील शासकीय नोकरीत जो काही शासकीय कोटा आहे, त्याचाही लाभ घेता येईल. याशिवाय, शासनाच्या इतरही सुविधांचाही लाभ गोविंदांना घेता येणार आहे. दुर्दैवाने दहीहंडी दरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये शासनाच्या वतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. जबर जखमी झालेल्या गोविंदांना आर्थिक मदत म्हणून साडे सात लाख रुपये तर हात-पाय फ्रॅक्चर झाल्यास (होऊ नये पण दुर्दैवाने झाल्यास) पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Share