चंद्रपूर अपघात : मृतांच्‍या कुटुंबीयांना सीएम फंडातून प्रत्‍येकी पाच लाख रुपये

चंद्रपूर : चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे डिझेल टॅंकर व लाकडांनी भरलेल्या ट्रकमध्ये झालेल्‍या भीषण अपघातात मृत्‍युमुखी पडलेल्‍या नऊ जणांच्‍या कुटुंबीयांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून प्रत्‍येकी पाच लाख रुपये अर्थसाहाय्य देण्‍याची घोषणा मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

वडसा येथून लाकूड घेऊन चंद्रपूरला येणारा ट्रक (क्र. एम. एच. ३१/सी. क्यू. २७७०) आणि चंद्रपूरवरून डिझेल भरून मूलकडे जाणारा टँकर (क्र. एम. एच. ४०/बी. जी. ४०६०) यांची गुरुवारी (१९ मे) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर-मूल मार्गावर असलेल्या अजयपूर येथे समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातानंतर भीषण आग लागली. आगीमुळे ट्रकचे टायर फुटले आणि आग आणखी भडकली. त्यामध्ये ट्रक व टँकरमधील ९ जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. मृत नऊपैकी पाच जण बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली गावातील होते. मृतांमध्ये दहेलीतील प्रशांत नगराळे (वय ३३), मंगेश टिपले (वय ३०), भय्यालाल परचाके (वय २४), बाळकृष्ण तेलंग (वय ५७) आणि साईनाथ कोडापे (वय ४०) यांचा समावेश होता. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता पाचही मृतांवर मोक्षधाम येथे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत उजेड नसल्यामुळे मोबाईल आणि बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी पार पडला.

या भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्‍यमंत्री सहायता निधीतून अर्थसाहाय्य देण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री, भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍याकडे केली होती. अपघातानंतर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्र्यांना पत्र पाठवून मुख्‍यमंत्री निधीतून मृतांच्‍या कुटुंबीयांना पाच लाख रुपये अर्थसाहाय्य देण्‍याची मागणी केली होती. मुख्‍यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्‍याशी त्‍यांनी चर्चादेखील केली होती. तसेच आ. मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांची भेट घेत तातडीने याबाबतचा प्रस्‍ताव शासनाला पाठविण्‍याची विनंती केली.

 

आमदार किशोर जोरगेवार यांनीही अजयपूर येथे झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून केली होती. आ. सुधीर मुनगंटीवार आणि आ. किशोर जोरगेवार यांच्या मागणीची तातडीने दखल घेत मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्‍येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे.

Share