तरुण शेतकऱ्याचा डोक्यात लाकडाने वार करून खून

हिंगोली : शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा डोक्यात लाकडाने वार करून खून केल्याची घटना रविवारी (२२ मे) सकाळी उघडकीस आली आहे. देवानंद संतोष मुधोळ (वय २० वर्षे) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील गौळ बाजार येथे ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील गौळ बाजार येथील संतोष मुधोळ यांचे गावापासून जवळच १२ एकर शेत आहे. त्यांच्या शेताजवळूनच कालवा गेला असल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देता येते. संतोष मुधोळ यांचा मुलगा देवानंद हा मागील काही दिवसांपासून शेतात रात्रीच्या वेळी पिकला पाणी देण्यासाठी जात होता. नेहमीप्रमाणे देवानंद मुधोळ हा शनिवारी रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेला होता. आज रविवारी सकाळी तो घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मुधोळ यांच्या शेजारी शेत असलेले शेतकरी शेतात जात असताना देवानंद याचा मृतदेह बाजेवर आढळून आला. या प्रकाराची माहिती शेतकऱ्यांनी तातडीने गावात कळवली. त्यानंतर देवानंदच्या कुटुंबियांनी शेतात धाव घेतली.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम, माजी सभापती फकीरराव मुंडे यांनी मुधोळ यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी शेतामध्ये बाजेवर देवानंद मुधोळ याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात लाकडाने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले. डोक्यात वार करण्यासाठी वापरलेले लाकूडदेखील बाजेच्या बाजूला आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, कळमनुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रोयलावार, उपनिरीक्षक सोनुळे, जमादार घ्यार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

मयत देवानंद मुधोळ याच्या पश्चात आई, वडील भाऊ व बहीण असा परिवार आहे. देवानंदचा खून कोणी आणि कोणत्या कारणामुळे केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणात कळमनुरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मुधोळ याच्या मारेकर्‍याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, श्वान पथकाने काही अंतरावर असलेल्या रस्त्यापर्यंतच माग काढला.

Share