अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या नावात बदल; चित्रपटाचे नवे नाव ‘सम्राट पृथ्वीराज’

मुंबई : बॉलिवडूचा अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पृथ्वीराज’ चे नाव बदलण्यात आले आहे. श्री राजपूत करणी सेनेने न्यायालयात धाव घेतल्यानंतर ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचे नाव बदलले आहे. ‘सम्राट पृथ्वीराज’ असे या चित्रपटाचे नवे नाव असणार आहे. ३ जून २०२२ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारचा हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातून सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारली जात आहे. यशराज फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पूर्वी या चित्रपटाचे नाव ‘पृथ्वीराज’ असे होते. श्री राजपूत करणी सेनेने या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला होता. काही दिवसांपूर्वीच करणी सेनेने एक पत्र लिहित या चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी केली होती. तसेच करणी सेनेने या चित्रपटाच्या नावाविरोधात कोर्टात धाव घेत जनहित याचिकादेखील दाखल केली होती. याबाबत अनेक बैठका आणि नोटीसा मिळाल्यानंतर ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे निर्माते यशराज फिल्म्सने राजपूत समाजाच्या भावना आणि मागणीचा विचार करून चित्रपटाचे नाव ‘पृथ्वीराज’ ऐवजी ‘सम्राट पृथ्वीराज’ असा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

यशराज फिल्म्सचे निवेदन
याबाबत यशराज फिल्म्सने निवेदन दिले आहे. या चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर यशराज फिल्म्सद्वारे करणी सेनेला एक पत्र देण्यात आले आहे. या पत्रात यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षये विधानी यांनी म्हटले आहे की, गेल्या ५० वर्षांपासून यशराज फिल्म्स भारतीय सिनेसृष्टीत काम करत आहे. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात यशराज फिल्म्सने अनेक आयकॉनिक चित्रपट दिले आहेत. आम्ही सातत्याने रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहोत आणि करत राहू. आमच्या चित्रपटाच्या नावासंबंधी तुमची जी तक्रार आहे त्याची आम्ही दखल घेतली आहे. यावर आम्ही तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, आमच्याकडून कोणाच्याही भावना दुखावतील किंवा शूर योद्धा पृथ्वीराज चौहान यांचा अपमान होणार नाही याची काळजी घेऊ. उलट आम्ही त्यांच्या शौर्याचे, कामगिरीचे आणि देशाच्या इतिहासात दिलेले योगदानाचा आदर करतो. यासंदर्भात आपल्यामध्ये झालेल्या अनेक चर्चांनंतर आम्ही शांततेत तुमच्या तक्रारीचे निवारण करत आहोत. आम्ही चित्रपटाचे नाव बदलून ते ‘सम्राट पृथ्वीराज’ असे करू. आम्ही श्री राजपूत करणी सेना आणि त्यांच्या सदस्यांचे आभार मानतो. तुम्ही आमच्या चित्रपटासंबंधीच्या भावना समजून घेतल्या, असेही या पत्रात म्हटले आहे.

https://twitter.com/yrf/status/1530089163235553280?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1530089163235553280%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmanoranjan%2Fyash-raj-films-changed-prithviraj-name-to-samrat-prithviraj-starring-akshay-kumar-and-manushi-chillar-nrp-97-2947319%2F

‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार हा पृथ्वीराज चौहानच्या मुख्य भूमिकेत दिसत आहे. यात पृथ्वीराज चौहान यांनी शौर्याने युद्धे कशी जिंकली आणि दिल्लीची सुल्तानी कशी मिळवली हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यातील लढाईचे दृश्यही पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाद्वारे २०१७ ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त अभिनेता संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा आणि मानव वीज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे.

Share