छत्रपतीही मावळे घडवतात : संभाजीराजेंच्या मुलाकडून संजय राऊतांना प्रत्युत्तर

सोलापूर : कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम राहत शिवसेना प्रवेशाची अट धुडकावून लावल्याने शिवसेनेने संभाजीराजेंना पाठिंबा न देता संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना संभाजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपतीही मावळे घडवतात. ही देवाण-घेवाणीची प्रक्रिया आहे, अशा शब्दात त्यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.

राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत येत्या जुलैमध्ये संपत आहे. खा. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचे जाहीर करून आपल्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून शिवसेनेने समर्थन द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती; परंतु आधी तुम्ही शिवबंधन बांधा, आम्ही तुमची उमेदवारी जाहीर करतो, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. शिवसेनेची ही भूमिका मान्य नसल्याने संभाजीराजेंनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचे वृत्त आहे. शिवसेनेने संभाजीराजेंना पाठिंबा न देता त्यांना अटी, शर्ती घालून फसवणूक केल्यामुळे संभाजीराजे समर्थकांसह मराठा संघटनांकडून शिवसेनेवर विशेषत: संजय राऊत यांच्यावर तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला. या साऱ्या घडामोडीदरम्यान संजय राऊत यांनी छत्रपतींच्या घराण्याला राजकीय पक्षांचे वावडे असण्याचे कारण नाही, मावळे असतात म्हणून राजे असतात, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर संभाजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

सोलापूर शहरातील संभाजी आरमार या सामाजिक संघटनेच्या १४ व्या वर्धापन दिनी शिवपूर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती यांना निमंत्रित केले होते. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीच्या पार्श्वभूमीवर ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी त्यांनी युवराज छत्रपती शहाजीराजे यांना या कार्यक्रमासाठी सोलापुरात पाठवले होते. यावेळी युवराज छत्रपती शहाजीराजे यांनी केलेल्या भाषणात सूचक पण सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने महत्त्वाचे विधान केले. आपल्याला राजकारण फार काही कळत नाही; पण काल माध्यमांत बातमी होती की, मावळ्यांमुळे छत्रपती घडतात; पण मला सांगायचंय की, छत्रपतीही मावळे घडवतात. ही देवाण-घेवाणीची प्रक्रिया आहे, अशा शब्दात युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.

यावेळी युवराज छत्रपती शहाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वडिलांच्या उमेदवारीवरुन सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केले. राजकारणाची चिंता रोजच्या जीवनात आणणे हे मला पटत नाही. सध्या चालू असलेल्या घडामोडींमुळे आमच्या आजूबाजूचे लोक चिंतेत आहेत. राजेंचं काय होणार? राजे काय करणार आहेत? राजे माघार घेणार की काय? पण आमच्या घरात अजिबात तणावाचे वातावरण नाही. काल रात्रीदेखील मी आणि आई घरात काय साहित्य खरेदी करावे यावर चर्चा करत होतो. आम्ही कोणत्याही प्रकारच्या तणावात नाही. आमचं नेहमीप्रमाणे सगळं सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
या सगळ्या घडामोडींवरून संभाजीराजेंबद्दल जनतेच्या मनात किती प्रेम आहे हे लक्षात येते; पण राजकारणाची चिंता रोजच्या जीवनात आणणे मला पटत नाही. आम्ही जर खूश नसलो तर लोकांसाठी कसे काम करणार, असे शहाजीराजे छत्रपती म्हणाले.

मावळ्यांमुळेच राजे होतात या संजय राऊतांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, बरोबरच आहे, त्यात चुकीचे काही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना ताकद कोणी दिली तर मावळ्यांनी दिली; पण मावळ्यांना शिवाजी महाराजांनीच घडवले. संभाजीराजेंच्या मागे इतक्या संघटना का आहेत? संभाजीराजेंनी मावळ्यांना दिशा दिली आणि त्यांनी ताकद परत दिली. हे एक नातं आहे. महाराष्ट्रातून संभाजीराजेंना, छत्रपती घराण्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. मागील तीन दिवसातील घडामोडी पाहिल्या तर इतका पाठिंबा कुठून मिळतोय याचे आश्चर्य वाटते. हे पाहून चांगले वाटते आणि यामुळे जबाबदारी वाढते, असेही युवराज शहाजीराजेंनी सांगितले.

Share